जामखेड: राष्ट्रीय महामार्गाची कामे येत्या 10 दिवसांत मार्गी लावा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी आमसभेत दिला. आमसभेत नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्गाबाबत तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर आमदारांनी सबंधित विभागाला थेट इशारा दिला. यावेळी त्यांनी मुजोर अधिकार्यांचे चांगलेच कान उपटले.(Latest Ahilyanagar News)
यावेळी तहसील कार्यालय, नगरपरिषद, कृषी विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्याबाबत नागरिकांनी तक्रारींचा पाऊसच पाडला. यामध्ये अनेक प्रश्नांबाबत नागरिकांचे समाधान झाले आहे.
नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन अधिकार्यांकडून त्या सोडविण्याचा प्रयत्न आमदार पवार यांनी केला. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली आमसभा सायंकाळी सात वाजेपर्यंत चालली. सलग सात तास आमदार पवार यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावरून प्रशासनाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचं स्पष्ट होतं.
नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणत्याही शेतकर्याला यातून वगळण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. याशिवाय वीजकनेक्शनबाबत अडवणूक, रोहित्र न बसविणे, निकृष्ट दर्जाचें काम, रस्ते अडविणं, काही शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसणं, रेशनकार्ड न मिळणं, पैसे घेऊन बोगस रेशनकार्ड देणं, पात्र असूनही डोल न मिळणं, कामं मंजूर असूनही त्यांची निविदा रखडविणं, वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सीना नदीला आलेल्या पुरामुळं झालेलं नुकसान, बंधार्यांच्या गेटचे प्रश्न, वनविभागाकडील तक्रारी, रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना लाभार्थ्यांना देण्यात येणारा त्रास, लंपीचं लसीकरण, प्रशासनाकडून झालेली अनेक चुकीची कामं, , अधिकारी वेळेत न भेटणं अशा अनेक तक्रारींचा पाऊस नागरिकांनी यावेळी पाडला. सामान्य नागरिकांच्या एवढ्या तक्रारी असतील तर प्रशासनानेही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
गोर-गरीब जनतेकडून पगारी सरकारी नोकर कामसाठी पैसे मागत असतील तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनतेला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांची कामं वेळेत झाली पाहिजेत, अशी अपेक्षावजा सूचना यावेळी आमदार पवार यांनी प्रशासनाला केली. आमसभेला प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, बीडीओ शुभम जाधव , मुख्याधिकारी अजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शशिकांत सुतार, कृषी अधिकारी रवींद्र घुले, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महावितरणाचे कटकधोंड यांच्यासह सर्व विभागांच्या अधिकार्यांरी उपस्थित होते.
चार वर्षांत एकही शेततळे नाही
तालुक्यात गेल्या 4 वर्षांपासून रोजगार हमीच्या माध्यमातून एकही शेततळे झाले नाही. अनेक शेतकर्यांनी याबाबत आमसभेमध्ये तक्रारी केल्या. त्यामुळे आमदार पवार यांनी कृषी अधिकार्यांना याबाबत तत्काळ निर्णय घेऊन शेतकर्यांना शेततळ्यांचा लाभ देण्याबाबत अमदार पवार यांनी अधिकार्यांना बजावले. त्यावर शेतकर्यांनी टाळ्या वाजवून समाधान व्यक्त केले.
कार्यपद्धती खपवून घेणार नाही
पुढील काळात नियमितपणे अशा आमसभा घेतल्या जातील. कुणी चुकीचं काम केल्याचं किंवा सामान्य नागरिकांना त्रास दिल्याचं आढळून आलं तर ही बाब कदापि खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी आमदार रोहित पवार यांनी अधिकार्यांना दिली.