जामखेड : जामखेड पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. इच्छुकांनी सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. जामखेड पंचायत समितीचे सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले; परंतु अजून गट व गणाचे आरक्षण राहिल्याने इच्छुकांना गट व गणाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.(Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने पंचायत समितीचा कारभार प्रशासक करत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागल्याची दिसत आहे. जामखेड तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गण झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळणार आहे .
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार व सभापती प्रा. राम शिंदे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यातच मित्र पक्षांचे आव्हान मोठ्या प्रमाणात राहणार आहे. खरी लढत ही गट व गणाचे आरक्षण जाहीर झाल्यावर होणार आहे.