जामखेड: खोटा रिपोर्ट का देता? असा सवाल करीत नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या व्यक्तीने चक्क 'बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकीन, तुम्हाला जीवे मारून टाकीन', अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शुक्रवारी (दि. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा प्रकाशसिंग राजपूत (रा. नान्नज, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते. अश्विनी परसराम झगडे या परिचारिका रुग्णांना सलाईन लावत होत्या. त्यावेळी कृष्णा राजपूत आरोग्य केंद्रात आले.
'खोटा रिपोर्ट का देता?' असे विचारत आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे ओपीडीतील वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती पाहून वैद्यकीय अधिकारी स्मिता भोरे यांनी बाहेर येत राजपुत यांना येथे इतर रुग्ण आहेत. त्यांना त्रास होत आहे. तुम्ही बाहेर थांबा,' असे सांगितले. मात्र, हे सांगितल्याचा राग आल्याने राजपूत यांनी डॉक्टर भोरे आणि परिचारिका अश्विनी झगडे यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर संबंधिताने डॉक्टर व परिचारिकेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच 'बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकीन', असी धमकी देऊन आरडाओरड केली. एवढ्यावर न थांबता तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आला आणि दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी भोरे यांनी फिर्यादीत केला आहे.
घटनेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी स्मिता भोरे यांच्यासह अश्विनी परसराम झगडे, लक्ष्मण रंगनाथ ठोसर, अविनाश अर्जुन तोरडमल आणि हसीना बिन्तेशब्बीर शेख हे कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात कृष्णा प्रकाशसिंग राजपुत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार तुकाराम सोनवणे करीत आहेत.