जामखेड: जामखेड तालुक्याच्या सीमेवरील साकत शिवारात तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २५) घडली. या दुर्घटनेत बैलगाडीत असलेले पाच जण थोडक्यात बचावले.
संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीच्या कामासाठी साकत-कडभनवाडी येथील बारले शिवारात बैलगाडीने जात होते. त्यांच्यासोबत शहाजी महादेव वराट, संगिता शहाजी वराट, सोहम संभाजी वराट आणि एकनाथ नारायण वराट असे पाच जण होते. रस्त्यावर वीजेची तार तुटून पडलेली असताना बैलांचा त्या तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोन्ही बैल जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.
बैलगाडीला टायरची चाके असल्याने गाडीमध्ये करंट न आल्याने त्यातील पाच जण सुदैवाने बचावले. या दुर्घटनेत बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. “पेरणी तोंडावर आली असताना बैल गेले. आता नांगरणी व इतर शेतीची कामे कशी करायची? सरकारने तातडीने मदत द्यावी,” अशी मागणी संभाजी वराट यांनी केली.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन सावंत तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मोटेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे महावितरणचे अभियंता शिंदे यांनी सांगितले.