जामखेड: तालुक्यात बुधवारी (दि. 13) सायंकाळी वादळी वारा व मुसळधार पावसाने अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले. अनेक घरांचे नुकसान, आंबा बागांची पडझड तसेच शेततळ्यांचे नुकसान झाले. मतेवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. मौजे धामणगाव येथे राजेंद्र नारायण घुमरे यांच्या घरावरील काही भाग उडून गेला. बऱ्हाणपूर चोभेवाडी परिसरातही अनेक घरांवरील पत्रे उडून गेली.
लक्ष्मण गणपत वाळुंजकर व चंपाबाई लक्ष्मण वाळुंजकर यांच्या घरावरील पत्रे पूर्णपणे उडून गेल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. याच परिसरातील आंब्याच्या बागांनाही मोठा फटका बसला. अनेक झाडांवरील आंबे गळून पडले. फांद्या तुटल्याने मोठे नुकसान झाले. काही शेततळ्यांचे बांध खचल्याने व पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंजेवाडी येथेही वादळी पावसामुळे बाबुशा लक्ष्मण जाधव यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. मौजे नान्नज येथील शेतकरी अजिनाथ अर्जुन कुमटकर यांच्या आंबा व निंबोनी बागांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची महसूल व कृषी विभागाने त्वरित पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आश्वीसह परिसरातही पावसाचा हाहाकार
संगमनेर तालुक्यातील आश्वीसह परिसराला शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अवघ्या अर्धा-पाऊण तास चाललेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आश्वी इरिगेशन बंगल्याजवळ रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तत्परतेमुळे रस्ता तातडीने मोकळा करण्यात आला.
पिंपरी फाटा येथील शेतकरी ज्ञानदेव गिते यांच्या बागेतील तब्बल 100 लिंबाची झाडे मुळासकट उखडून पडली. आश्वीसह पानोडी, झरेकाठी, शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपूर, शेडगांव, मालुंजे, खळी आणि दाढ खुर्द या भागातही शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आश्वी सबस्टेशन आणि परिसरात विद्युत वितरणाचे अनेक खांब जमीनदोस्त झाले. यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीसाठी प्रयत्न करत असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कामाला वेळ लागू शकतो. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
झाडे तातडीने हटविली
आश्वी इरिगेशन बंगल्याजवळ मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि महायुतीचे पदाधिकारी यांनी तातडीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. विखे पाटील यांनी प्रशासनाला तत्काळ आदेश दिले. अवघ्या काही वेळातच जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील झाडे बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत झाली.