राशीन : ‘उदो बोला उदो.. उदो, आईसाहेबाचा उदो..., उदो बोल भवानी की जय असा गगनभेदी जयघोष, सोबतीला ढोल- ताशे, नगारे आणि झांजांचा लयबद्ध आणि सातत्यपूर्ण गजर, रणसिंगाचा लक्षवेधी निनाद, तोफांची आसमंत दणाणून टाकणारी सलामी, चंगाळे, बंगाळ्याचा मर्दानी खेळ, आराधी व दिवट्यावाल्यांचे जथ्थे, उत्साहाला आलेले उधाण, अशा चैतन्यमय वातावरणात राशीनच्या जगदंबा देवीचा पालखी महोत्सव सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. त्यामुळे राशीन शहर भक्तिरसात न्हाऊन गेले होते.(Latest Ahilyanagar News)
घटस्थापनेला सुरू झालेल्या यमाई मातेच्या यात्रेची कोजागरी पौर्णिमेला सांगत होते. विजयादशमीनिमित्त उत्साहात सीमोल्लंघन झाले. यानिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्री 12 वाजता निघालेली मिरवणूक रात्री आठ वा. देवीच्या मंदिराजवळ विसर्जित झाली. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सर्व ग्रामस्थ सीमोल्लंघनासाठी आले. तिथे एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन अभिवादन केले. घरी गेल्यावर सुवासिनींकडून औक्षण केले गेले. यानंतर रात्री दहा वा. नागरिक देवीच्या मुख्य यात्रेसाठी मंदिरात आले. या वेळी पारंपरिक पद्धतीने जगदंबा (यमाई देवीला कौल (प्रसाद) मागतात. कौल (प्रसाद) मागण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला.
याचवेळी देवीने उजव्या बाजूचे फूल (प्रसाद) देताच सर्व भाविकांनी गुलालाची उधळण करीत देवीचा जल्लोष केला. त्यानंतर जगदंबा देवी व तुकाई देवीचे मुखवटे पालखीमध्ये ठेवण्यात आले. त्या वेळी भाविकांनी एकच जल्लोष करीत पालखीवर गुलाल आणि खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. सिंहाच्या आवारात पालखी आल्यानंतर भक्तीच्या या अनोख्या सागरात भान हरपून भाविक भक्तिरसात चिंब झाले. रात्री मंदिरातून पालखीने प्रस्थान ठेवले. सकाळी पालखी गावाच्या मुख्य रस्त्यावर आली. यानंतर दिवसभर संपूर्ण गावात पालखी प्रदक्षिणा घातली. या वेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर सडा, मनमोहक रांगोळ्या काढल्या.
गावातील प्रत्येक रस्त्यावर पालखीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेमुळे सर्व रस्ते बाजारपेठेत अलोट गर्दी होती. बाजारात संसारोपयोगी साहित्य, स्टेशनरी, कटलरी, खेळणी, मिठाईची दुकाने, तसेच आनंदनगरी थाटली आहे. पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पालखी मिरवणुकीदरम्यान ज्यांचे दर्शन होईल त्यांनी तत्काळ बाजूला व्हावे, ज्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी दर्शन घ्यावे, अशा प्रकारची सूचना सर्वच पदाधिकारी, पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली.