नगर: शहरात नगर-पुणे महामार्गालगत मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोरील चौकात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी (दि. 27) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, आमदार संग्राम जगताप यांनी अंतिम टप्प्यातील तयारीच्या कामाचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रमुख पाहुण्यांचे रविवारी सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमस्थळी आगमन होणार आहे. आधी जाहीर सभा होणार असून, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या सोहळ्यानिमित्त नव्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच आकर्षक आतषबाजी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीचे प्रमुख सुरेश बनसोडे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
महापालिकेचे अभियंता परिमल निकम म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त होणार्या जाहीर सभेसाठी मार्केटयार्ड चौकाजवळील पांझरपोळ मैदानावर भव्य मंच वॉटरप्रूफ जर्मन हँगर पद्धतीचा अत्याधुनिक मंडप उभारण्यात आला आहे.
त्यात सुमारे दहा ते बारा हजार नागरिकांची आसनव्यवस्था आहे. मुख्य मंचाच्या शेजारी दोन छोटे मंच असून यावर धर्मगुरू भन्तेंची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. दुसर्या मंचावर गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यासाठी अहिल्यानगरमधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे. दरम्यान, माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणार्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळ्यासाठी चौथर्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजनही रविवारी सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आमदार जगताप यांनी या तयारीचीही पाहणी केली.