नगर: गणपती बाप्पांचे आगमन बुधवारी हर्षोल्हासात झाले आणि गुरुवारी अहिल्यानगर शहरासह शेवगाव, पाथर्डी, नेवासा, नगर आदी तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर शहर आणि परिसरात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती.
दरम्यान, हवामान खात्याने 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शुक्रवारी (दि.29) मात्र विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता व्यक्त केली. या दिवशी जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’जारी केला आहे. त्यामुळे जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर शहर आणि परिसरात गुरुवारी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही तोच रात्री पावसाने हजेरी लावली. हलक्या स्वरुपाच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. त्यानंतर रात्री एक-दीडच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.
दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळपासूनच आभाळ भरून आले होते. सायंकाळी पाचपासून जोरदार पावसास प्रारंभ झाला. सावेडी, माळीवाडा, चितळे रोड, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, नालेगाव आदी ठिकाणी जवळपास तासभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरू होत्या. या पावसाने रस्त्यांवरून पाणी वाहिले. सखल भागात पाणी साचले असून, शहरातील छोटे छोटे नाले काही काळ वाहिले. सायंकाळी अचानक झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. शेवगाव, नेवासा, पाथर्डी, नगर तालुक्यांत देखील शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या कित्येक दिवसांनंतर झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.