MLA Amol Khatal Attacked in Sangamner:
संगमनेर: संगमनेर फेस्टिव्हल या कार्यक्रमासाठी आलेले आमदार अमोल खताळ यांच्यावर एका तरुणाने गुरुवारी रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मालपाणी लॉन्स येथे ही घटना घडली. आ. खताळ यांच्या अंगरक्षकाने वेळीच हल्लेखोराला पकडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोर युवकाचे नाव असल्याची व तो खांडगावचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की गुरुवारी (दि. 28) रात्री मालपाणी लॉन्स येथे राजस्थान युवक मंडळातर्फे आयोजित संगमनेर फेस्टिव्हल या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असताना ते नागरिकांशी हस्तांदोलन करत होते. त्याच वेळी एका तरुणाने हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असतानाच आ. खताळ यांच्या अंगरक्षकाने व कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेत तरुणाला रोखले आणि पकडले.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेने परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी जमाव शांत करून तरुणाला ताब्यात घेतले. स्वतः आमदार अमोल खताळ घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पोलिस अधिकार्यांशी चर्चा करून घटनेची माहिती दिली.
आमदार खाताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणा दिल्या. गल्लोगल्ली चौकाचौकत गावोगावी नागरिक घोळक्याने चर्चा करत होते.
दरम्यान, या घटनेचा सर्वच संघटनांनी, राजकीय पदाधिकार्यांनी निषेध केला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन प्रसारित करावे, अशी मागणी त्यांनी केली.