Doctor Arrested Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Illegal Abortion Racket: गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; 13 जण अटकेत

राहाता व श्रीरामपूर परिसरात गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

नगर: गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील राहाता आणि श्रीरामपुरातील मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस तपासात गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, गर्भपातासाठी गोळ्या पुरवणाऱ्या श्रीरामपुरातील एका डॉक्टरलाही काल पोलसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. राज अजीज शेख असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 13 वर पोहचली आहे.

अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनात श्रीरामपूर आणि लोणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पिंपरी निर्मळ येथील गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकला होता. यावेळी डॉक्टर, एजंटसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाघचौरे यांनी गांभीर्याने तपासाला दिशा देत रॅकेटची पाळेमुळे शोधून काढली.

यामध्ये श्रीरामपुरचे डॉ. रवींद्र कुटे यांच्यापर्यंत हे धागेदोरे पोहचले. महिलांच्या गर्भपात प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्यात आले. अशाप्रकारे या गुन्ह्यात एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट व सहा संबंधित महिलांचे पती यांचा समावेश आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना, बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या श्रीरामपूर येथील डॉ. राज अजीज शेख हा पुरवत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यांनी काल बुधवारी पहाटे वार्ड क्रमांक दोनमधून डॉ. शेख याला उचलले. त्याने आपण गर्भवती महिलांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवत होतो, अशी कबुली दिल्याचे समजले. आरोपी शेख याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत 13 आरोपी अटकेत आहेत. याशिवाय गर्भलिंग निदान करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.

जिल्ह्यात आणखी काही गर्भलिंग निदान मशीन

पुण्यातील दोघांकडून गर्भलिंग निदान करण्यासाठी पिंपरी निर्मळच्या रॅकेटने दोन मशिनरी खरेदी केल्याचे पुढे येत आहे. मात्र, संबंधित दोघेही पुण्यातील अन्य गुन्ह्यात अटक आहेत. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली आहे. येत्या दोन दिवसांत हे दोघे श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात येतील. या चौकशीत त्यांनी जिल्ह्यात आणखी किती मशीन विकले आहेत, ते कोणाकडे आहेत, यामध्ये एजंट कोण होते, याची सर्व माहिती पुढे येणार असल्याने या तपासाकडे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT