ज्ञानदेव गोरे
वाळकी: येथील धोंडेवाडी तलावात शिल्लक असलेला पाणीसाठा वाळकी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांचा आदेश आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याने ऐन टंचाई काळात तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे.
टंचाई काळात तलावातील पाणी आरक्षित ठेवण्यासाठी दोन वर्षांपासून लढा देत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला दूरध्वनीवरून शेतकर्यांकडून शिवीगाळ व धमकी देण्यात येत आहे. वाळकी येथील 108 दशलक्ष घनफूट क्षमतेचा असलेला धोंडेवाडी तलाव अवैध पाणीउपशामुळे ऐन उन्हाळ्यात टंचाई काळात कोरडा पडत आहे. (Latest Ahilyanagar News)
तलाव क्षेत्रात शेतकर्यांनी अतिक्रमण करत अनेक अनधिकृत विहिरी खोदल्या असून, पाटबंधारे विभागाच्या जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षामुळे अवैध पाणीउपशाला बळ मिळत आहे. राजरोसपणे शेतकर्यांकडून पाणीउपसा होत आहे. बेसुमार पाणीउपसा व अनधिकृत विहिरींकडे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
तलावातील पाण्यावरच वाळकीतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. अवैध पाणीउपशामुळे दर वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या संकटाला वाळकी परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. ऐन टंचाई काळात पिण्यासाठी तलावातील पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी करत दोन वर्षांपासून पाठपुरावा करणार्या सामाजिक कार्यकर्ते आशिष कासार यांच्या प्रयत्नांना यश आले.
पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तलावातील अवैध पाणीउपसा बंद करून पाणी योजनेसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाकडून या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे.
पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाने तलावातील पाणीउपसा सुरूच असून, पाण्यासाठी लढा देत असलेल्या कासार यांना बाबुर्डी बेंद येथील शेतकर्यांकडून शिवीगाळ करण्याबरोबरच धमकीचे दूरध्वनी येत आहेत.
धोंडेवाडी तलाव क्षेत्रात वाळकी, खडकी, बाबुर्डी बेंद या गावांच्या जमिनी गेल्या आहेत. वाळकीतील शेतकर्यांच्या जास्त जमिनी तलाव क्षेत्रात गेल्या असल्या, तरी बाबुर्डी बेंद व खडकीतील शेतकर्यांकडून तलाव क्षेत्रात अनधिकृत विहिरी खोदून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने तलाव ऐन उन्हाळ्यात कोरडा पडत आहे. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी गंभीरपणे दखल घेऊन अवैध पाणीउपसा रोखण्याबरोबरच अतिक्रमणधारक शेतकर्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कासार यांनी केली आहे.
पाणीपुरवठ्यात विस्कळितपणा!
वाळकी ग्रामपंचायतकडे घोसपुरी पाणी योजनेची थकबाकी असल्याने पाणीपुरवठ्यात विस्कळितपणा येत आहे. तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले. त्यामुळे आशिष कासार यांनी स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना भेटून पत्रव्यवहार व सतत पाठपुरावा केला. पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश असताना पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत आहे.