राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी महिला- पुरुष अधिकारी-कर्मचार्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांची भेट घेवून, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना पाठींबा व्यक्त केला. शेतकर्यांच्या हितार्थ काम करणार्या कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्ष उभा आहे, असे सांगत, आपल्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडू, असे तनपुरे यांनी ठणकावून सांगितले.
तनपुरे यांनी विद्यापीठातील अधिकारी व कर्मर्र्यांशी संवाद साधताच, कुलसचिव डॉ. राजेंद्र पाटील यांनी तत्काळ दखल घेत, विद्यापीठ प्रशासनाला आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) आंदोलक अधिकारी-कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे तनपुरे म्हणाले.
यावेळी आंदोलक महिला-पुरुष म्हणाले की, कृषि विद्यापीठांच्या प्रमुख तीन स्तंभापैकी कृषि विस्तारामध्ये कृषी विज्ञान केंद्र प्रमुख भूमिका निभावत आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रोहित कडू, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. सचिन सूर्यवंशी, जीवन आरेकर, सचिव डॉ. प्रमोद मगर व कोषाध्यक्ष डॉ. सचिनकुमार सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करीत, अधिकारी व कर्मचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
कृषि विज्ञान केंद्रातील आस्थापनेवरील सर्व पदे मंजुर आहेत. अधिकारी व कर्मचार्यांच्या नेमणुका आदर्श नियमावलीचा अवलंब करुन झाल्या आहेत. सामंजस्य करारानुसार कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी- कर्मचार्यांना विद्यापीठ कर्मचार्यांप्रमाणे लाभ द्यावेत, अशी सहमती झाली आहे. याकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) चे सर्वोच्च प्रमुख महासंचालकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले, असे असले तरी, विद्यापीठ प्रशासन या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी झटकत आहे, अशी ओरड आंदोलकांनी केली.
कर्मचार्यांना वाहतूक भत्ता व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील शासन हिस्सा नियोक्ता देणे कायद्यांन्वय्ये बंधनकारक आहे, मात्र विद्यापीठ प्रशासन ही जबाबदारी टाळत आहे. ही कृती कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान करीत आहे. याप्रश्नी कुलगुरु, कुलसचिव, नियंत्रक व संचालकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी आहे. मागील थकीत वेतन, अधिकारी- कर्मचार्यांना विद्यापीठ कर्मचार्यांप्रमाणे सेवा- सुविधांचा लाभ मिळावा, या मागण्यांसाठी राज्य कृषि विद्यापीठे व कृषि विज्ञान केंद्रांच्या कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.
‘माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विद्यापीठाचे कुल सचिव व आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वय साधला. विद्यापीठ प्रशासनाने कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी-कर्मचार्यांना सापत्नीक वागणूक देऊ नये, असे सांगत तनपुरे यांनी याप्रश्नी दखल घेण्यास सांगितले. यानुसार कुलसचिव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा ‘शब्द’ दिला आहे.
कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी- कर्मचार्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे कैफियत मांडताना सांगितले की, विद्यापीठ सुरक्षा विभागाने आंदोलनकर्त्यांना सापत्न वागणूक दिली आहे. वाहने परिसरात आणू दिली नाही. महिला आंदोलनकर्त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करू दिला नाही. यावर तनपुरे यांनी विद्यापीठ सुरक्षारक्षकांनी आंदोलनकर्त्याशा सापत्न वागू नये, असे ठणकावून बजावले.