आश्वी : अंघोळीसाठी तापवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे घडली. सिंधुबाई नामदेव सोसे (52 वर्षे) आणि त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (5 वर्षे) असे मृतांची नावे आहेत.(Latest Ahilyanagar News)
दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी गरम पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात दोघेही जवळपास 60 टक्के भाजले. त्यांना तात्काळ प्रवरा ग्रामिण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र 15 सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला, तर मंगळवार (23 सप्टेंबर) नातू राहुल प्रकाश सोसे याचीही प्राणज्योत मालवली.
एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर आणि खळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, मुलगा प्रकाश सोसे, योगेश सोसे, दोन सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे, तर नातू राहुलच्या पश्चात छोटी बहीण गौरी व आई-वडील असा परिवार आहे.