जामखेड: यंदा मेच्या दुसर्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सकाळी ढगाळ वातावरण, मध्येच कड़क ऊन आणि पाऊस, यामुळे सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणार्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील दवाखाने, रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झालेली दिसत आहे.
सतत बदलत्या वातावरणाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. सर्दी, खोकल्यासह अनेकजण तापाने फणफणले आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. खासगी रुग्णालये देखील फुल होताना दिसत आहे. नगरपरिषद व स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
गेल्या 20 दिवसात तापमान 42 अंशावरून थेट 28 अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे तापमान 14 अंशांनी कमी झाल्याने वातावरणात चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे कमाल किमान तापमानात देखील मोठी घट झाली आहे. त्यामुळे वातावरण बदलल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. शासकीय रुग्ण सेवा सुस्त झाल्याने या रुग्णाच्या संख्येत वाढ होत चालली असल्याचे दिसते.
गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अंगदुखी, अनुत्साही वाटणं, डोकेदुखी वाढली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्दी, खोकल्याचे ग्रासले आहे. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे, डबकी साचली आहेत. त्यातच कचरा पडत आहे.
पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्यामुळेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी डासांमुळे उद्भवणारे आजार वाढत आहेत. परिणामी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. लवकर पाऊस झाल्याने माशा, डास, चिलटांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सध्या आंबा, फणस, जांभळाचा हंगाम आहे. मात्र, फळांचा कचरा, साली आणि खराब फळांमुळे माशा आणि चिलटांचे प्रमाण बाढले आहे. त्यामुळे वातावरणात किटकांचे प्रमाण वाढते आहे. हेच माशा आणि चिलटे घरातील अन्न, हॉटेलमधील, हातगाड्यांवरील पदार्थांवर बसून आजार पसरवत आहेत.
दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली असून, दरवर्षी जूनमध्ये पावसाची वाट पाहवी लागते. काहीवेळेला जून कोरडाच जातो. यंदा मात्र मेपासूनच पावसाला सुरुवात झाली, सकाळी पाऊस व दुपारी कडक उन्हं या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे.
‘त्या’ रुग्णांनी त्वरितडॉक्टराना भेटा: डॉ. शिंदे
वातावरण बदलल्यामुळे सर्दी, ताप, खोकलाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. काही डेंग्यूचेदेखील रुग्ण आढळत आहेत. सध्याचे वातावरण विषाणूजन्य आजारांना पोषक आहे. अंगदुखी, ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. डॉ. महेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय जामखेड
कोरोन चाचणी करा
सध्या कोरोनाचे रुग्ण राज्यात सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सर्दी, खोकला, ताप असणार्या रुग्णांची सरसकट कोरोनाची चाचणी केली जात नाही, तसेच शासकीय रुग्णालयामध्ये देखील चाचणी केली जात नाही. फक्त इन्फ्लुएन्झासरश आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ झाल्यावरच त्याच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. रुग्णांच्या जीवाला थेट धोका होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी कोरोना चाचण्या सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अशी घ्या काळजी
सदी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील लहान मुलांचे लसीकरण करा. घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, याची काळजी घ्या, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करा. पावसाळ्यातील पाणी गाळून, उकळून प्या. उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळा, मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थांचे सेवन टाळा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.