अतिवृष्टीचा मोठा फटका! नगर जिल्ह्यात 283 बंधारे फुटले Pudhari
अहिल्यानगर

Flood damage bunds breached Ahilyanagar: अतिवृष्टीचा मोठा फटका! नगर जिल्ह्यात 283 बंधारे फुटले

पाथर्डी, शेवगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान; पाझर तलाव, साठा बंधारे, गाव तलावांचे मोठे नुकसान, अहवालात उघड

पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर : जिल्ह्यात दि.14 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीपिकांसह रस्ते, वीज, आणि बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 12 तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसून, तब्बल 283 तलाव, बंधारे फुटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अजुनही काही ठिकाणी पाहणी बाकी असून, नुकसानीची ही आकडेवारी वाढणारी आहे.(Latest Ahilyanagar News)

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून उभे केलेले पाझर तलाव, साठा बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गाव तलाव, वळचणी बंधारे हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. पावसाळ्यात पाणी अडवून बंधाऱ्यात ते साठवल्यामुळे हजारो हेक्टर पिकांची सिंचनाची, जनावरांच्या पाण्याची तसेच काही ठिकाणी मानवी वस्त्यांचीही तहान भागविण्याचे काम यातून होते. त्यामुळे पावसाळ्यात बंधारे भरल्यानंतर शेतकरी त्याचे जलपूजन करताना दिसतात.

साधारणतः 1972 च्या दरम्यान रोजगार हमी अंतर्गत बहुतांशी पाझर तलाव उभारले होते. मात्र त्यानंतर दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच अनेक तलाव हे धोकादायक असल्याचे लक्षात आले होते.

दि. 14 पासून परतीच्या पावसाने शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेडसह अन्य तालुक्यांनाही झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे दिसले. अशाप्रकारे सुमारे 283 तलाव, बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कार्यकारी अभियंता शिवम डपकर, उपअभियंता आनंद रुपनर आदींच्या टीमने पावसाने नुकसान झालेल्या बंधारे, पाझर तलावाची पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.

दरम्यान, काही भागात अजुनही पाणी आहे. त्यामुळे शेतात जाता येत नाही. परिणामी बंधाऱ्यांची नुकसानीची पाहणी तसेच दुरुस्ती काही दिवस शक्य नसल्याचे दिसते आहे. निसर्गावरील अतिक्रमण, राजकीय भांडवल व फायदा, तांत्रिक चुका यामुळे ही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याचे बोलले जाते.

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सीईओंच्या सुचनांनुसार बंधारे, पाझर तलावांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेत आहोत. प्रथमदर्शनी 288 बंधारे भराव वाहून गेले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आनंद रूपनर, उपअभियंता

भराव फुटल्याने जमिनी खरडून गेल्या

जिल्हा परिषदेने बांधलेल्या बंधाऱ्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने ओव्हर फ्लो होऊन भराव वाहून गेला. त्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांसह जमिनी खरडून गेल्या आहेत. आता याचे पंचनामे कोणी करायचे, त्याची भरपाई कोणाकडे मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पाझर तलाव : 88

साठा बंधारे : 162

कोल्हापूर बंधारे : 28

गाव तलाव : 4

वळचणी बंधारे : 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT