नेवासा : तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परिसरातील निंभारी, अंमळनेर, करजगांव, वाटापूर, तामसवाडी, पानेगांव, शिरेगांव, खेडलेपरमानंद, लांडेवाडी, गणेशवाडीसह सोनई परिसरात मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकर्यांचे होत्याचे नव्हते झाले. (Latest Ahilyanagar News)
ढगफुटीसदृश पावसाचा केंद्रबिंदू शिरेगांव, राजळे वस्ती, खेडले परमानंद येथे झाल्याचे शेतकरी, तसेच शिरेगाव माजी सरपंच किरण जाधव यांनी आमदार लंघे यांना सांगितले. शेतातील बाजरी, कपाशी, ऊस, मका, घास आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तेथील ओढ्यालगतच्या जमिनी वाहून गेल्या असून, ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोनईकडे जाणारे रस्ते बंद झाले.
करजगांव- गणेशवाडी, पानेगाव-सोनई-खेडलेपरमानंद शिरेगाव येथील ओढ्याच्या पुलावरून प्रचंड पाणी वाहत असल्याने विद्यार्थी, दूधउत्पादक शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच काहींना घरी थांबावे लागले. त्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. पाहणी दौर्यात परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
सरसकट पंचनामे करा: लंघे
दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तातडीने शुक्रवारी दिवसभर परिस्थिती पाहणी दौरा केला. नुकसान झालेल्या सर्व गावांना त्यांनी भेट दिली. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्यासह तलाठी, कृषी अधिकारी, स्थानिक ग्रामविकास अधिकारी, महावितरण कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आ. लंघे यांनी तहसीलदारांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. महसूल प्रशासन तातडीने पंचनामे करीत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
सर्वच नद्यांना पूर; जवळा बंधार्याचा भराव वाहून गेला
जामखेड तालुक्यातही शुक्रवारी अतिवृष्टीने झोडपले. तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने सर्वच नद्यांना पूर आला आहे. जवळा बंधार्याचा भराव वाहून गेल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. शहरातील विचारणा नदीला पूर आला असून दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. तालुक्यात शुक्रवारी दुपारी 3 वाजता जामखेड, पाडळी, बावी, आरणगाव, धानोरा, फक्राबाद, डोणगाव, हळगाव, जवळा, बोर्ले, नान्नज, साकत, खर्डा आदी गावांत ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नद्याना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले. पावसामुळे विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली.
मागील काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात पावसामुळे नदी-नाले- ओढे तुडंब भरलेले आहेत. शहराला वरदान ठरणारा भुतवडा तलाव काही दिवसापूर्वीच ओव्हर-फ्लो झालेला आहे. तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प, मोहरी प्रकल्प तुडुंब भरलेले आहे. विंचरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जामखेड शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती.