

अहिल्यानगर ः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका नराधमाने 4 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी हा पीडित मुलींचा दूरचा नागलग आहे. आई-वडील विभक्त झाल्यामुळे या मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. पण त्यानेच हे दुष्कृत्य केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीसह त्याच्या पत्नीच्याही मुसक्या आवळल्या. स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा भांडाफोड केला. 4 पीडितांपैकी 1 मुलगी सज्ञान आहे, तर उर्वरित तिघी अनुक्रमे 16, 14 व 10 वर्षांच्या अल्पवयीन आहेत.
पीडित मुलींपैकी एका मुलीचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणींना भेटण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी तातडीने स्नेहालय या संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुल पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी चारही मुलींची सुटका केली व आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या.