पाथर्डी: तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये नद्या तुडुंब भरून वाहू लागल्याने गावोगाव जनजीवन विस्कळित झाले. तलाव फुटण्याचा धोका, पूल वाहून जाणे, गावांचा संपर्क तुटणे, शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरणे, वाहने वाहून जाणे अशा घटना घडल्या. नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पूरस्थिती पाहता प्रशासनाने तालुक्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली.
तलाव फुटण्याची भीती
शिरसाटवाडी येथील बिबे आंब्याच्या तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून तलाव धोकादायक स्थितीत आहे. केळवंडी येथील पाझर तलावाला मोठे भगदाड पडले असून तो फुटण्याची भीती आहे. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे केळवंडी व खालील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थ हरीश शेटे यांनी वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती दिली; मात्र प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याचा आरोप होत आहे. डोंगरपट्ट्यातील काही तलाव फुटण्याच्या भीतीने गावकऱ्यांनी रात्रीभर जागून काढली. प्रशासनाच्या ढिलाईबद्दल संताप व्यक्त होत आहे.
धामणगावच्या पुरणतांडा भागातून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पाण्यात एक कार वाहून गेली. स्थानिक तरुणांनी दोरीच्या साह्याने मढी येथील दोघांना सुखरूप बाहेर काढले व वाहनही वाचवले. जांभळी येथील पुलाचा रस्ता वाहून गेल्याने पाथर्डीशी संपर्क तुटला.
आल्हनवाडी देवळाली रस्त्यावरील पूल तुटल्याने भुकन, गव्हाणेवस्ती, वाघदरातांडा व मालदारातांडा यांचा संपर्क तुटला. कोरडगाव-बोधेगाव मार्गावरील मुख्य पूल वाहून गेल्याने दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे तोंडोळी, कळस पिंपरी, औरंगपूर, जिरेवाडी, सोनोशी, दैत्यनांदूर या गावांचा पाथर्डीशी संपर्क तुटला.
दूधउत्पादक गाव म्हणून ओळख असलेल्या शिरसाटवाडीला पाण्याने वेढले असून वाडीचा पाथर्डीशी संपर्क तुटला आहे. पाथर्डी शहराला दूधपुरवठा ठप्प झाला. शेतकऱ्यांनी दोर बांधून नदीपात्रातून दुधाच्या कॅन घेण्याची कसरत केली.
वाळुंज, दुले चांदगाव, पागोरी, पिंपळगाव या नदीकाठच्या गावांमध्ये घराघरांत पाणी शिरले. माळेगाव, खेर्डे, दूले चांदगाव, आगसखांड, निपाणी जळगाव या गावांचा पूल वाहून गेल्याने गावोगाव संपर्क तुटला. दरम्यान, शनिवारी (दि. 20) पुरात वाहून गेलेल्या शिरापूर येथील अतुल रावसाहेब शेलार (वय 31) याचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिसगाव येथे भडकेवस्तीजवळच्या बंधाऱ्यात सापडला.
आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, जोहरापूरला पुन्हा महापुराचा फटका
शेवगाव शहरासह तालुक्यात सोमवारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील सर्वच मंडळात चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यातून वाहणाऱ्या ढोर, नंदिनी, चांदणी, काशी आदी नद्यांसह ओढे-नाल्यांना महापूर आल्याने अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्र सोडून गावात तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत घुसल्याने खरीप पिकांचा अक्षरशः चिखल होऊन पिके भुईसपाट झाली. अनेक गावांचा तालुका व जिल्हाशी संपर्क तुटला आहे
अहिल्यानगर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर गेवराई, पैठण अशा शेवगावच्या चारही बाजूंची वाहतूक महापुरामुळे खोळंबल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे ठप्प झालेली वाहतूक दुपारनंतर सुरू झाली.
शेवगाव शहरासह तालुक्यातील भगूर, वरूर, वडुले, जोहरापूर, वडुले खुर्द, वाघोली, ढोरजळगाव, मळेगाव, लोळेगाव, आखतवाडे, बक्तरपूर, दहिगावने, राक्षी, चापडगाव, ठाकूर पिंपळगाव, बोधेगाव, बालमटाकळी परिसरातून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाणी गावात तसेच शेतात घुसल्याने घरातील मालमत्तेसह जनावरे वाहून गेली. पावसामुळे सर्वत्र दाणादाण झाल्याने शेवगावच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला आहे. महापुरात आखेगाव येथील बाबासाहेब काकडे यांचे पत्र्याचे घर वाहून गेले. तसेच पंधरा ते वीस कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरले.
आखेगाव - सोमठाणा पुलाचा भराव पूर्णपणे वाहून गेला. खडकी पूल तुटला. आखेगाव येथील युवा नेते शंकरराव काटे यांनी काकडे व पालवे आदी वस्त्यांवरील 40 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. वरूर गावाला पुराने वेढा घातल्याने सुमारे 50 कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य, धान्य वाहून गेले. भगूर गावातही सात फूट पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना फटका बसला गेला.
दरडवाडीचा पूल खचला; जामखेड-खर्डा मार्ग बंद
जामखेड ते खर्डा रोडवरील दरडवाडी येथील जुना दगडी पूल खचल्याने हा मार्ग बंद झाला आहे. जामखेडहून भूम, तुळजापूर, धाराशिव आणि हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सुतार यांनी आवाहन केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन या पुलाच्या सुरक्षिततेसाठी सतत निरीक्षण करत आहेत आणि लवकरात लवकर पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.