नगर : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीचा पेरा करण्यास अडथळा निर्माण झाला. ज्वारीची पेरणी 15 ऑक्टोबरपर्यंत होण्याची आवश्यकता होती. ज्वारी पेरण्यास उशीर झाल्यामुळे आता गहू, हरबरा आणि मका आदी पिकांच्या पेरणीस शेतकरी पसंती देण्याची शक्यता आहे. सध्या अवकाळी पावसामुळे रब्बी पेरणी रखडली आहे. आतापर्यंत फक्त 58 हजार 878 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी पेरणीत घट दिसत आहे.(Latest Ahilyanagar News)
यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक 131.5 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरातील सर्वच लहानमोठी धरणे देखील काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामी पिकांना अनुकूल वातावरण अशी परिस्थिती आहे. यंदा रब्बी हंगामासाठी 4 लाख 15 हजार 156 हेक्टर क्षेत्र निश्चित झाले. रब्बी पेरणीस दिवाळीपूर्वीच प्रारंभ होतो. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी केले. त्यामुळे दिवाळीपूर्वी रब्बी पिकांची पेरणी करणे अवघड झाले. दिवाळीनंतर पेरणी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. परंतु गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने गोंधळ घातला आहे. परिणामी पेरणीसाठी शेतकऱ्यांना बाहेर पडणे अवघड झाले.
जिल्ह्यात 58 हजार 878 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. ज्वारीसाठी 1 लाख 82 हजार 496 हेक्टर क्षेत्र निश्चित असताना आतापर्यंत फक्त 22 हजार 488 हेक्टर पेरणी झाली आहे. गव्हासाठी 1 लाख 23 हजार 590 हेक्टर असताना फक्त 68 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हरबरा पिकासाठी 10 हजार 772 हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत 1964 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गळीत हंगामासाठी 674 हेक्टर क्षेत्र निश्चित असून, आतापर्यंत फक्त 24 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यामध्ये 14 हेक्टर करडई तर एका हेक्टर जवसचा समावेश आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत ज्वारीचा पेरा 1 लाख 26 हजार 565 हेक्टर क्षेत्रावर तर गव्हाचा पेरा 21 हजार 90 हेक्टरवर तर हरबरा 28 हजार 793 व मका 14 हजार 760 हेक्टर क्षेत्रावर झाल्याची नोंद आहे. यंदा मात्र, सप्टेंबर महिन्यातील पावसाचा हाहाकार आणि दिवाळीनंतर सुरु झालेला अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची पेरणी रखडली आहे.
रब्बी हंगामात ऊस पिकाचा समावेश असून, या नगदी पिकाच्या नवीन लागवडीसाठी जिल्ह्यात 94 हजार 693 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. सध्या इतर पिकांपेक्षा ऊसाला भाव जादा मिळत असल्याने तसेच अतिवृष्टी व सततच्या पावसाचा या पिकावर म्हणावा असा परिणाम होत नसल्याने शेतकरी उसाला प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 34 हजार 3 हेक्टर क्षेत्रावर नवीन उसाची लागवड झालेली आहे.