

सोनई : मुळा कारखान्याने सन 2026-27च्या गळीत हंगामात 15 लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याची पूर्वतयारी म्हणून ऊस उत्पादनवाढीसाठी 30 कोटींची प्रोत्साहन योजना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी जाहीर केली. तसेच चालू हंगामात कार्यक्षेत्रातून गळिताला येणाऱ्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये पेमेंटची घोषणा त्यांनी केली. (Latest Ahilyanagar News)
मुळा कारखान्याचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 28) झालेल्या मुळा कारखान्याच्या 48व्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी संचालक नारायणराव लोखंडे व बबनराव दरंदले, तसेच कर्मचारी आगिनाथ केदार व बापूसाहेब तांबे यांनी सपत्नीक गव्हाणीची विधिवत पूजा केली. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. या वेळी कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या 40 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय शुगर या संस्थेमार्फत उत्कृष्ट शेतकी अधिकारी म्हणून दिलेल्या पारितोषिकाबद्दल शेतकी अधिकारी विजय फाटके यांचा सत्कार केला.
या वेळी कारखान्याचे अधिकारी शंकरराव दरंदले, व्ही. के. भोर, टी. आर. राऊत, योगेश घावटे, संजय टेमक, वर्क्स मॅनेजर एच. डी. पवार, शेतकी अधिकारी विजय फाटके, इंजिनिअर डी. बी. नवले, एच. डी. देशमुख, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले उपस्थित होते.
गडाख म्हणाले की, चालू वर्षी 1 नोव्हेंबरपासून कारखाने चालू करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 तारखेपासून नियमित पूर्ण क्षमतेने म्हणजे 8500 ते 9000 टनाने गाळप सुरू होईल. चालू वर्षी सर्व धरणे भरल्याने उसासाठी पोषक वातावरण आहे. पुढच्या वर्षीचा 2026-27चा हंगाम हा मोठा हंगाम राहील. 15 लाख टन गळिताचे उद्दिष्ट असल्याचे सांगून त्याची पूर्वतयारी म्हणून 30 कोटीची ऊस उत्पादनवाढीची प्रोत्साहन योजनाही गडाख यांनी जाहीर केली.
प्रोत्साहन योजनेनुसार शेतकऱ्यांना नवीन लागणी करण्यासाठी एकरी 8 हजाराचे बेणे आणि 6 हजार रुपयांचे खत उधारीवर पुरवण्यात येईल. कारखान्याने निवडलेल्या बेणे प्लॉटमधून हे बेणे पुरवले जाईल. या योजनेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी कारखान्याच्या गट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या हंगामात कार्यक्षेत्रातून गळिताला येणाऱ्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये पेमेंट करण्यात येणार असून, कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी मुळा कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास जाधव, सुभाष दरंदले, आम आदमी पार्टीचे राजू आघाव, बाळकृष्ण भागवत, तसेच आश्रू सानप यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व समारोप कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ नेते व कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख म्हणाले की, येणारा काळ चांगला राहील. उसाचा भावही जाहीर केला आहे. पुढच्या वर्षासाठी ऊसवाढीची योजना जाहीर केली आहे तिचा फायदा घ्या, पण थोड्याशा मोहासाठी इकडे तिकडे जाऊ नका, असे सांगून गडाख यांनी, ऊस भावात मुळा कारखाना कुठे कमी पडणार नसल्यामुळे सगळा ऊस मुळा कारखान्याला द्या, असे आवाहन केले.