शिर्डी: देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या लाखो भाविकांनी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांनी केलेल्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
उत्सवानिमित्त अमेरिकेतील साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. चेन्नई, तमिळनाडू येथील ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी 3 लाख 5 हजार 532 रुपये किंमतीचा 54 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडीत सुवर्ण ब्रोच साईचरणी अर्पण केला. (Latest Ahilyanagar News)
दुसर्या साईभक्ताने सुमारे 2 किलो वजनाचा चांदीचा हार आणि सुमारे 59 लाख रुपये किंमतीचा 566 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकूट साईबाबांच्या चरणी अर्पण केला.
गुरुवारी श्री साईसच्चरित अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व मेकॅनिकल विभागप्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांच्यासह साईभक्त उपस्थित होते.
भोपाल येथील सुमित पोंदा यांचा श्री साई अमृत कथा झाली. श्रींची माध्यान्ह आरतीनंतर दिल्लीच्या निरज शर्मा याचीं साईभजन संध्या झाली. सायंकाळच्या धुपारतीनंतर ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची साईसंध्या कार्यक्रम झाला. रात्री श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार असल्याने नित्याचे चावडी पूजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारची शेजारती आणि शुक्रवारची काकड आरती झाली नाही.
आज सांगता
तीन दिवसीय उत्सवाची सांगता आज शुक्रवारी होणार आहे. पहाटे मंगलस्नान त्यानंतर श्रींची पाद्यपूजा झाल्यानंतर गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. बोरीवलीच्या प्राची व्यास यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. माध्यान्ह आरतीनंतर श्रीरामपूरच्या रोहित दुग्गल यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार आहे. दुपारी हिमांशु जुनेजा यांचा साईभजन संध्या कार्यक्रमानंतर सांयकाळची धुपारती होणार आहे. रायपूरचे पद्मश्री मदनसिंह चौहान यांचा साई भजनसंध्या कार्यक्रमानंतर शेजारती होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.