Gutkha Seizure In Ghargaon Pudhari
अहिल्यानगर

Gutkha Seizure In Ghargaon: नाशिक-पुणे महामार्गावर गुटख्याचा मोठा साठा जप्त; १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घारगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; ३,५६८ पाकिटे जप्त, एकाला अटक तर सहा जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: राज्यात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. गुरुवारी (दि.५) नाशिक-पुणे महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी येथील साकुर ड्रायव्हर ढाब्याच्या पाठीमागे छापा टाकून ७ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

या कारवाईत ड्रायव्हर मनोज बाजीराव पाटील (वय ४०, रा. पंचवटी, नाशिक, मूळ रा. धुळे) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुपर कॅरी वाहनातून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता, ढाब्याच्या पाठीमागील शेडमध्ये सुपर कॅरी वाहनातून इनोव्हा कारमध्ये गुटख्याच्या गोण्या भरल्या जात असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच इनोव्हा कारमधील युसुफ दादा चौगुले व जब्बार दादा चौगुले (दोघेही रा. घारगाव) हे गुटख्यासह फरार झाले.

या कारवाईत विमल पानमसाल्याची १,७८४ पाकिटे व व्ही-वन तंबाखूची १,७८४ पाकिटे, अशी एकूण ३,५६८ पाकिटे जप्त करण्यात आली. तसेच ७ लाख रुपयांची सुपर कॅरी गाडी आणि २५ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १४ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी मनोज पाटील याच्यासह वैभव मोराडे, सुनील अमृतकर, धिरज माळी, कमलेश माळी, युसुफ चौगुले व जब्बार चौगुले अशा सात जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घारगाव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT