Godavari Sand Mining Protest Pudhari
अहिल्यानगर

Godavari Sand Mining Protest: गोदावरीतील वाळू उपशाविरोधात महिलांचा एल्गार

रामपूर-नाऊर ग्रामसभांत तीव्र संताप; ‘नदीतील एक खडादेखील उचलू देणार नाही’

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: तालुक्यातील रामपूर-कोकरे परिसरातील गोदावरी नदीपात्रातील वाळूपट्ट्याच्या लिलावाविरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, महिलांवर झालेल्या कथित दगडफेकीच्या घटनेनंतर रामपूर व नाऊर येथे झालेल्या विशेष ग्रामसभांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण करत ‌‘वाळूचा रस्ता होऊ देणार नाही, तसेच नदीपात्रातील वाळूचा एक खडादेखील उचलू देणार नाही,‌’ असा निर्धार व्यक्त केला.

तालुक्यातील रामपूर येथे आयोजित विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने महिला, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत वाळू उपसा व वाहतुकीला ठाम विरोध दर्शविला. परिसरातील शांतता, शेती व पाणीपुरवठा धोक्यात घालणाऱ्या वाळू उपशाविरोधात आता अहोरात्र जागता पहारा ठेवण्यात येईल, असा इशाराही ग्रामसभेतून देण्यात आला.

ग्रामसभेनंतर महिलांनी ट्रॅक्टरमधून नाऊर गावाकडे मोर्चा काढत तेथेही विशेष ग्रामसभा घेतली. नाऊर ग्रामस्थांनीदेखील एकमुखाने वाळू उपशाला विरोध दर्शवत शासनाने संबंधित वाळूपट्ट्याचा लिलाव तत्काळ रद्द करावा, अशी मागणी केली. या वेळी अनेक शेतकरी व महिलांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या.

“गोदावरी नदीमुळेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय टिकून आहेत. नदीपात्रातील वाळूमुळे पाझरपाणी टिकते आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहते. त्यामुळेच या भागात अद्याप तीव्र पाणीटंचाई जाणवलेली नाही,” असे ग्रामस्थांनी सांगितले. वाळू उपशामुळे भूजलपातळी खालावण्याचा धोका निर्माण होणार असून भविष्यात शेती उद्ध्वस्त होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

महिलांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, स्थानिकांच्या भावना आणि शेतीचे हित लक्षात न घेता वाळू उपशाचा निर्णय राबविण्यात आल्यास तीव्र स्वरूपात समृद्धी महामार्गवर लोकआंदोलन उभे राहील.

दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार?

महिलांवर दगडफेक होऊनही संबंधित वाळू वाहतूकदारांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुका महसूल प्रशासनाने घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

..तर सराला बेटालाही धोका: रामगिरी महाराज

रामपूर-नाऊरसह सराला-गोवर्धन, वांजरगावसह गोदावरी परिसराचा वाळू उपशाला विरोध असून वाळू उचलल्यामुळे पाण्याचा स्पीड वाढून बेटाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीत पाणी असताना तहसीलदारांना ठेकेदाराला ताबा देण्याचा किंवा नदीपात्रात साधन नेण्याचा कुठलाही अधिकार नाही. याबाबत पालकमंत्री विखे पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून अजूनही गरज पडल्यास काही मंत्र्यांशी बोलू. वाळू उपशाविरोधात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे रामगिरी महाराजांनी सांगितल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT