नगर तालुका: घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत त्यामधून अनधिकृतपणे व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करणाऱ्या तिघांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांच्या ताब्यातून 33 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे बुधवारी (दि.29) रात्री ही कारवाई करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)
चिचोंडी पाटील गावात प्रविण नारायण खडके हा त्याच्या घराचे आडोशाला घरगुती वापराकरीता असलेला गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करुन घरगुती गॅस टाक्याची तो व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करुन बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अनंत सालुगडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड, उमाकांत गावडे यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठविले.
पोलिस पथकाने प्रविण खडके याच्या घरी छापा टाकला असता तेथे गॅस टाक्या, चार वाहने मिळुन आली. पोलिसांनी प्रविण नारायण खडके (रा.चिचोंडी पाटील ता.नगर), वैभव आंबादास पवार (रा.सांडवा ता.नगर), गणेश पद्माकर भोसले (रा.काष्टी ता.श्रीगोंदा) यांना ताब्यात घेतले. घरगुती गॅस टाक्या व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याचे सांगितले.
गॅस टाक्या वाहनामधुन आणुन त्यामधील गॅस व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये भरत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी 25 लाखांची चार वाहने, 8 लाख 31 हजार 700 रुपये किंमतीच्या एच.पी. व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 264 भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या, तसेच गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 33 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.