Agricultural pump wire theft in Patharwadi
जवळा: पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील धर्मा बाबा परिसरातील कुकडी कालव्यावर शेतकर्यांनी बसविलेल्या कृषिपंपांच्या तांबे तारेची चोरट्यांनी चोरी केल्याचा नेल्याची घटना 13 रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली.
पठारवाडी शिवारात सुनील सुपेकर, सुनील पठारे, शंकर ढवळे, नीलेश पठारे आदी शेतकर्यांनी कुकडी कालव्यावर बसविलेल्या सात कृषिपंपांची तोडफोड करून त्यांनी त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्या. काही कृपिपंपांची केबलही चोरून नेली आहे. (Latest Ahilyanagar News)
अनेक दिवसांपासून या परिसरात कृषिपंपांतील तांब्याच्या तारा व केबल चोरून नेण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. परंतु पोलिसांना चोरट्यांचा काही तपास लागत नाही. त्यामुळे त्यांचे आणखीच धाडस वाढत चालले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जवळा, पठारवाडी, गाडीलगाव, गुणोरे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, कोहोकडी परिसरात चोर्या करणार्यांची टोळी सक्रिय झाली असून अनेकवेळा चोर्या करूनही ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहे, शेतकरी पोलिसांकेड तक्रार देण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.
त्यामुळे ते याचा गैरफायदा घेत आता आणखी धाडसाने अशा प्रकारच्या चोर्या करू लागले आहेत. यामध्ये मात्र शेतकर्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे.तसेच शेतीमालांनाही फटका बसत आहे. या परिसरात लवकरच कांदा लागवडी चालू होत असून सोयाबीन व इतर पिकांनाही पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
परंतु अशा ऐनवेळेस कृपिपंपांची केबल व त्यातल्या तारा चोरून नेण्याचे प्रकार वाढल्यामुळे शेतकर्यांन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा प्रकारच्या चोर्या करणार्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.