गणेशोत्सवात मंडळांना मंडप परवाने ऑनलाईन; महापालिकेतर्फे सोमवारीपासून सुविधा उपलब्ध Pudhari
अहिल्यानगर

Ganeshotsav Pandal Permit: गणेशोत्सवात मंडळांना मंडप परवाने ऑनलाईन; महापालिकेतर्फे सोमवारीपासून सुविधा उपलब्ध

सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी सर्व परवाने एकाच क्लिकवर मिळणार आहेत. महापालिका, महावितरण व शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

त्यासाठी www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)

परवाने देण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी योजना राबवली जात होती. मागील वर्षीपासून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावरून परवाने दिले जात आहेत. याही वर्षी संकेतस्थळावरून परवानने दिले जाणार आहेत. मात्र, जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी गणेश मंडळांना त्यांच्या स्तरावर घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती शाडू मातीच्याच वापराव्यात. ध्वनिप्रदूषणाबाबत कायदे व शासकीय नियमांचे पालन करावे. मंडळाने घेतलेल्या सर्व परवाने मंडप किंवा कमानींच्या दर्शनी भागात लावावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंडपांसाठी नियम..

उत्सव काळात मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी. 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारणार असल्यास सुरक्षिततेसाठी अधिकृत स्थापत्य अभियंत्याकडून स्टॅबेलिटी सर्टिफिकेट जोडावे. मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन वाहने जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत.

गणेशोत्सव संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत मंडप, रनिंग कमानी, देखावे, बांधकाम हटवण्यात यावे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेल्या मंडळांनी मिरवणूक सुरू होण्यापूर्वी तेथील मंडप, कमानी काढून घ्याव्यात. मंडप उभारणीसाठी रस्त्यावर कुठेही खड्डे खोदू नयेत, अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT