

संगमनेरः संगमनेर नगरपालिकेत, ‘प्रशासक राज’ असल्यामुळे अक्षरशः सावळा गोंधळ सुरु असल्याचे दिसत आहे. अधिकारी व कर्मचारी कामास टाळाटाळ करतात. परिणामी विविध कामांसाठी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. बहुतांश अधिकारी जागेवर नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
संगमनेर नगरपालिकेची तीन वर्षांपासून निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या कामासाठी पुढाकार घेणार्या नगराध्यक्षांसह नगरसेवक नसल्याने याचा गैरफायदा अधिकारी व कर्मचारी घेत असल्याचे ओरड ऐकू येत आहे. अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. कर्मचारी वेळेत कामावर हजर होत नाहीत. (Latest Ahilyanagar News)
कामावर आल्यानंतर ते जागेवर उपलब्ध होत नाहीत. इकडे-तिकडे वेळ वाया घालविण्याचे गैरप्रकार नगरपालिकेत सुरू आहेत. अधिकार्यांचा कर्मचार्यांवर वचक नसल्यामुळे ते गैरफायदा घेत आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून विविध पदांवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाले, परंतू रिक्त जागांसाठी नव्याने भरती झाली नाही. 2011 सालच्या लोकसंख्येनुसार नगरपालिकेत शहराची लोकसंख्या 65 हजार दाखविली आहे. सध्या 2025 चा विचार करता ही लोकसंख्या तब्बल लाखावर गेली आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे. यापूर्वी पालिकेत साडेचारशे ते पाचशे कर्मचारी व अधिकारी कार्यरत होते. यामुळे कामाला गती होती.
दाद मागायची कुणाकडे?
‘प्रशासक राज’ असल्यामुळे तब्बल तीन वर्षांपासून पालिका मुख्याधिकारीच सर्व कारभार पहात आहे. संगमनेर पालिकेत सध्या 176 अधिकारी व कर्मचार्यांची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात 2025 साल लक्षात घेता, शहराची लोकसंख्या लाखावर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, पालिकेत अधिकारी व कर्मचार्यांची संख्या कमी आहे, असे वेळेत काम न होण्याचे कारण सांगितले जाते. यासर्व प्रकारात पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे हतबल झाले आहेत. आता या विरोधात दाद मागायची कुणाकडे, असा यक्षप्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संगमनेरकर करीत आहेत.