पाथर्डी: गणेशोत्सव हा उत्साह आणि भक्तीचा सण आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया. सर्व गणेश मंडळांनी शासनाचे नियम, उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी पाथर्डी येथे आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत केले. या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी, ध्वनिप्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थापनासह महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
पाथर्डी पोलिस ठाण्यात गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. शहरातील मानाचे आठ गणपती मंडळे आणि इतर गणेश मंडळांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या. Bhandardara and Nilwande dam overflow
यावेळी पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, मंडळाचे प्रतिनिधी राजेंद्र कोटकर, नंदकुमार डाळिंबकर,संतोष लाटणे, अभिजित बोरुडे, संतोष चेन्ने, विनोद चेन्ने, सागर पाथरकर, सुनील क्षीरसागर, विकास बोरूडे, शुभम भोसले, अण्णा बोरुडे, शिवा परदेशी,ओमकार रोड़ी, सद्दाम शेख,शुभम भोसले आदी उपस्थित होते.
पुजारी म्हणाले, मिरवणुकीदरम्यान डीजे वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. पारंपरिक वाद्ये वापरून मुंबई उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियंत्रण आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, लेझर लाइट्सच्या वापरावरही कडक बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मिरवणुकीत केवळ नैसर्गिक गुलाल वापरण्याचे आणि रासायनिक गुलाल, रांगोळी टाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विसर्जन प्रक्रिया पर्यावरणपूरक पद्धतीने करून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा, असेही सांगण्यात आले.
वाहतूक व्यवस्थापनावर भर देताना, मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्व मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे पुजारी यांनी स्पष्ट केले.
तीन गणेश मंडळांचा गौरव
नियमांचे पालन करणार्या आणि समाजात आदर्श निर्माण करणार्या पहिल्या तीन गणेश मंडळांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, तसेच दोन मंडळांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. गणेशोत्सव शांततामय, धार्मिक आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी वरील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक पुजारी यांनी केले.
विसर्जन मिरवणुकीसाठी वेळापत्रक
मानाच्या आठ गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणूक दुपारी 2 वाजेापासून पंधरा मिनिटांच्या अंतराने क्रमाने काढावी, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यामुळे विसर्जन प्रक्रिया शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा पुजारी यांनी व्यक्त केली. सामाजिक आणि शैक्षणिक संदेशांना प्राधान्य देण्यासाठी मंडळांनी सजावट आणि कार्यक्रमांतून समाजप्रबोधनाचे संदेश द्यावेत, असे आवाहनही करण्यात आले.