नगर: शहरात बाप्पांच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका प्रशासाने गणेशोत्सवासाठी पूर्वतयारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना मंडपउभारणी, मिरवणूक, ध्वनिक्षेपकाचा वापर, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा आदींसाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. महापालिकेने जुन्या २७२ मंडळांच्या परवान्यांना पाच वर्षांकरिता मुदतवाढ दिली आहे. नव्याने शंभर अर्ज प्राप्त झाले असून, येत्या दोन दिवसांत पडताळणी करून त्यांनाही परवानगी देण्यात येणार आहे.
शहरातील गणेश मंडळांना महापालिका प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत यासाठी आता काही परवान्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. महापालिकेच्या ‘amcfest’ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या संदर्भातील व वीजजोडणी संदर्भातील परवानगी मिळणार आहे.
तसेच, अग्निशमन, पोलिस प्रशासनाची परवानगी मिळणार आहे. शहरातील मंडळांसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्यास प्रारंभ झाला असून, आतापर्यंत शंभर मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. नव्या मंडळांना १३ सप्टेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज सादर करता येणार आहेत. महापालिका प्रशासनाने जुन्या २७२ मंडळांना पाच वर्षांकरिता मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे या मंडळांना धावपळ करण्यासाठी गरज नाही. प्रशासन त्या मंडळांच्या जागेची पाहणी करणार आहे. नव्याने परवागी घेणाऱ्या गणेश मंडळांना मंडपउभारणी, सार्वजनिक ठिकाणाचा वापर, वीजजोडणी, अग्निशमन विभागाचे ना हरकत, वाहतूक शाखा पोलिस, ध्वनिक्षेपकाचा वापर असे परवाने आवश्यक आहेत.
मंडळांनी नियमांचे पालन करावे
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी.
ध्वनिक्षेपकाच्या नियमांचे पालन करावे.
परवानगी दिलेल्या वेळेतच ध्वनिक्षेपकाचा वापर करावा.
रस्ते आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी.
मंडप सुरक्षित पद्धतीने उभारावा.
अग्निसुरक्षेची आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत.
विद्युत तारा आणि जोडणी सुरक्षित ठेवावी.
मिरवणुकीसाठी निश्चित केलेल्या मार्गाचे पालन करावे.
प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करावे.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराचे नाव, पत्ता, आधार कार्ड, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी, माेबाईल क्रमांक, मंडपाचा स्थळ नकाशा.