जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील  Pudhari Photo
अहिल्यानगर

Minister Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा विकास आराखड्यासाठी 192 कोटींचा निधी : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील : दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई झालेली; कारवाईवर मी समाधानी नाही

पुढारी वृत्तसेवा
  • रोजगार निर्मिती व सकल उत्पादनवाढीस मदत

  • दूध व पनीर भेसळ करणार्‍यांवर अधिक कडक कारवाईचे निर्देश

नगर : जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी 191 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रोजगार निर्मिती व जिल्ह्याचे सकल उत्पादन वाढीसाठी कृषी, उर्जा विकास व पर्यटन क्षेत्राशी संलग्न प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. दूध भेसळ करणार्‍यांवर कारवाई झालेली आहे. मात्र, या कारवाईवर मी समाधानी नाही. दुध व पनीर भेसळ करणार्‍यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषधी प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशीनाथ दाते, पालक सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, झेडपी सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर आदी तालुक्यात दूध भेसळीची कीड लागली आहे. अन्न व औषध विभागाकडे यापूर्वी कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे अपर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तपास समिती नियुक्ती केली होती. त्यानुसार काही ठिकाणी कारवाई झाल्या. मात्र, मी समाधानी नाही. आता मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध केले आहे. मानवी आरोग्यासाठी घातक दूध व पनीर निर्मितीमध्ये भेसळ करणार्‍यांची अन्न व औषध विभागामार्फत तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या निर्देश दिले आहेत. भेसळ तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा हवी. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

विकसित भारतासाठी राज्याची सन 2028 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके पोहोचविण्याचे राज्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी 191 कोटी 92 लाखांचा निधी मंजूर केला. या निधीतून रोजगार निर्मिती व जिल्ह्याचे सकल उत्पादन वाढीसाठी कृषी, उर्जा विकास व पर्यटन क्षेत्राशी संलग्न प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नगर व शिर्डी एमआयडीसीत कंपन्यांची गुंतवणूक होऊन रोजगार क्षमता वाढीस मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 व्या जयंतीनिमित्त कुकडी आवर्तनातून चौंडी बंधारा भरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 31 मेपर्यंत चौंडी येथील तलाव पूर्णपणे भरलेले असतील.

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वसतिगृह

केंद्रीय व राज्य लोकसेवा परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी बर्‍यापैकी यश संपादन करीत आहेत. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी अहिल्यानगर व शिर्डी येथे वसतिगृह उभारले जाणार आहे. श्री साई संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत वसतिगृह उभारले जाईल. याबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालये उपलब्ध केली जाणार आहेत. जिल्ह्यातील चांगल्या शिक्षण संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना अनुदान उपलब्ध केले जाणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान येणार यादृष्टीनेच चौंडीला तयारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा झाली. त्या कार्यालयाकडून देखील तयारीबाबत विचारणा झालेली आहे. मात्र, सध्याची युद्धजन्य परिस्थिती बघता याबाबतचा निर्णय पंतप्रधान कार्यालयच घेणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी येणार या दृष्टीनेच जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT