करंजी: पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणार्या ट्रकने समोरून येणार्या एसटी बस, कार, टेम्पो, जीप आणि मोटरसायकल अशा जवळपास पाच वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये एसटी बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले, तसेच मोटरसायकलस्वार, कार, टेम्पो, जीपमधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले.
पाथर्डीहून कल्याणकडे जाणार्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बसमधील जखमी प्रवाशांना तत्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. अपघातानंतर मात्र चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. (Latest Ahilyanagar News)
एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघात नेमका कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली.
एका ट्रकमुळे इतर पाच वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून, या अपघातामध्ये सर्व वाहनांचे मोठे नुकसानही झाले आहे. माणिकशहा पीरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्याने या ठिकाणी घाटातील दोन्ही बाजूने वाहनांची लांबलचक रांग लागली होती.
काही वेळाने या ठिकाणी राज्य पोलिस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. सातत्याने या धोकादायक वळणाजवळ वाहनांचे अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.