

नगर: पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचे मोहटा देवी गॅस गोडावून फोडून गॅसच्या टाक्या पळविणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. धाराशीव येथून टोळीचा म्होरक्या ताब्यात घेतला असून, यातील फरार असलेल्या आठ जणांच्या पोलिस मागावर आहेत. आरोपीच्या कबुलीतून चोरलेल्या 130 टाक्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
दि.10 जून रोजी सुनिल अंकुशराव बेळगे यांनी गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्याची पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे आदेश केले होते. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, दि. 19 रोजी धाराशीव गावचे परिसरात जाऊन राजेंद्र काळे यास ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने सुंदर शिंदे, रामा काळे , गुलाब काळे, सुनिल पवार, दत्ता पवार, लगमण पवार, शंकर काळे, माणीक काळे सर्व धाराशीव (सर्व फरार) अशांनी मिळून हा गुन्हा केला. या गुन्ह्यात सुनिल पवार याची स्कॉर्पिओ गाडी व रामा सुबराव काळे याचे सहाचाकी ट्रक,अशी वाहने घेऊन यातून टाक्या चोरून पळवल्याचे समोर आले.
गॅस टाक्या हॉटेलमध्ये!
ट्रक खराब झाल्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे, रा.शिवाजीनगर, वाशी, ता.वाशी, याचेकडे त्याचे हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. पथकाने पंचासमक्ष राहुल चेडे याने हजर केलेल्या 5,20,000 रुपये किंमतीच्या 130 भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त केल्या आहेत.