राहुरी: राज्यभरात वारकर्यांची पावले पंढरीची वाट धरत असतानाच अनेक राजकीय नेत्यांनी सत्तेची वाट धरल्याचे चित्र आहे. राहुरीतही अपेक्षित तो राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते कृषी उत्पन्न बाजार समिती व तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर लवकरच अरुण तनपुरे व हजारो समर्थकांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजले आहे.
तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र संचालक हर्ष तनपुरे यांनी मुंबईत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आगामी राजकीय निर्णयाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तनपुरे कारखाना निवडणुकीत चुलते अरुण तनपुरे यांच्या खांद्याला खांदा देत प्राजक्त तनपुरे यांनी यशाचा किल्ला सर केला होता. तनपुरे कारखाना सुरू होण्याबाबत सत्तेचे पाठबळ गरजेचे असल्याचे बोलले जात असताना अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे अजूनही ‘तुतारी’ वाजवत असून राहुरीकरांना गुड न्यूज देऊनच ते योग्य निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राहुरीच्या सहकार क्षेत्रामध्ये अरुण तनपुरे यांनी लौकिकप्राप्त कामगिरी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकर्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. बाजार समितीमध्ये एकहाती नेतृत्व सांभाळणारे अरुण तनपुरे यांनी तनपुरे कारखान्याची सत्तासूत्रे ताब्यात घेतली आहेत. तनपुरे कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेच्या जप्ती मोहिमेत अडकलेल्या या कारखान्याला सभासद, कामगारांसह इतर कोट्यवधी रुपयांची देणी अदा करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्याचे चाक फिरवण्यासाठी सत्तेचा सारिपाट महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेत अरुण तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, राहुरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील भट्टड यांनी महत्त्वाची भूमिका घेत तनपुरेंचा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी पुढाकार घेतला. अरुण तनपुरे यांचे खंदे समर्थक अनिल सुराणा, शहराध्यक्ष नीलेश शिरसाठ यांची पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत अरुण तनपुरे व युवा नेते हर्ष तनपुरे यांचे पक्षात स्वागत करीत मोठी जबाबदारी देणार असल्याचा शब्द दिल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व पदाधिकार्यांनी तनपुरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
आता प्राजक्त तनपुरे यांची आगामी भूमिका काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवरच भाचे प्राजक्त तनपुरे यांचा निर्णय ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
अरुण तनपुरे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या जबाबदारीचा शब्द दिल्याचे समजले आहे.