हिंदुत्वाच्या नावावर जनतेची फसवणूक; माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सत्ताधार्‍यांवर टीका File Photo
अहिल्यानगर

Rahuri News: हिंदुत्वाच्या नावावर जनतेची फसवणूक; माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सत्ताधार्‍यांवर टीका

'नगर-मनमाड रस्त्याच्या साडेसातीला भाजपच जबाबदार'

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर मते मागितली. नाशिकचे सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता सोबत डान्स करत पार्टी केल्याचा आरोप भाजपने विधीमंडळात केला होता.

बडगुजर यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे सांगणार्‍या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच त्यांना पक्षात प्रवेश देत गोडवे गाणे सुरू केले. हा भाजपचा खरा चेहरा असून बेगडी हिंदुत्व दाखवून सत्ता लाटणार्‍या सत्ताधार्‍यांनी इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतही निष्पाप लोकांचा बळी घेतल्याचा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. (Latest Ahilyanagar News)

राहुरी येथे पत्रकारांशी संवाद साधत तनपुरे म्हणाले की, भाजप पक्षाने सत्तेसाठी वाटेल ते भूमिका घेतली आहे. एकीकडे हिंदुत्वाचा दिंडोरा पिटत भाजपचे नेते बेगडी प्रेम दाखवितात. तर दुसरीकडे पक्षप्रवेशासाठी भ्रष्टाचार तसेच आतंकवादी व गुंडांशी संबंध असणार्‍यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी पुष्प चादर टाकली जात आहे.

नाशिक येथील सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हिंदुत्वाचा दिंडोरा घेऊन फिरणार्‍या आमदारांनी बडगुजर यांच्याबाबत आतंकवाद्यांशी संबंधत असल्याचे आरोप केले होते. जामिनावर बाहेर असताना बडगुजर यांनी फरार आतंकवाद दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता समवेत पार्टी केल्याची चित्रफित दाखवित कारवाईची मागणी केली होती.

विरोधी पक्षात असला तर तो आतंकवाद्यांशी संबंधित व पक्षात आता तर तो खरा देशभक्त अशी भावना मांडत भाजपची वरिष्ठ नेते मंडळी बडगुजर यांची पाठराखण करत आहे. यावरूनच भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. बेगडी हिंदुत्वाच्या माध्यमातून भाजपने जनसामन्यांना फसवण्याचे कारस्थान सुरूच ठेवले आहे.

एकीकडे देशनिष्ठा असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे भाजपला पाठबळ देणार्‍या आतंकवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोप असणार्‍यांना क्लिनचिट द्यायची हा प्रकार जनतेला समजला आहे.

अनेक हिंदू शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अनेक निष्पाप हिंदुचे रस्त्यांवर बळी जात आहे. शासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे अनेक घटना घडत असून त्यात अनेकांची बळी जात आहे. परंतू द्वेषाच्या राजकारणाच्या माध्यमातून स्वतःची पोळी भाजून घेण्यात पटाईत असलेल्या भाजपकडून जनसामन्यांचे वाटोळे सुरूच असल्याचा आरोप माजी मंत्री तनपुरे यांनी केला.

नगर-मनमाड रस्त्याच्या साडेसातीला भाजपच जबाबदार

देशामध्ये 11 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपने केवळ जातीय राजकारण करून स्वहित साधले. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डेमय होणारी अवस्था पाहता केवळ खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय होत आहे.

मर्जीतले ठेकेदार व काही राजकीय नेत्यांचे खिशे भरण्यासाठी नगर-मनमाड रस्त्याची वाताहात केली आहे. त्याच रस्त्यावर अनेक निष्पाप हिंदु बांधव मृत होत आहेत. परंतु बेगडी हिंदुत्व परिधान करणार्‍या ‘त्या’ भाजप धार्जिने नेते व स्वयंघोषित रक्षकांना ती समस्या दिसेनासी झाल्याची टीका तनपुरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT