

राहुरी: डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अरुण बाबूराव तनपुरे यांची निवड गुरुवारी घोषित करण्यात आली. डिसेंबरपर्यंत कारखान्याचे चाक फिरवून सभासद, कामगारांना न्याय देणारच, असा शब्द नूतन अध्यक्ष तनपुरे यांनी सत्कार कार्यक्रमात दिला.
राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी जनसेवा मंडळाच्या सर्व 21 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. निवडणूक झाल्यापासून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची चर्चा होत होती. (Latest Ahilyanagar News)
अखेरीस गुरुवारी (दि. 19) कारखाना कार्यस्थळावर प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संचालकांनी अध्यक्षपदी अरुण तनपुरे यांची निवड केली. निवड झाल्यानंतर कारखाना परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. विवेकानंद नर्सिंग होम आवारात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एम. डी. पाटील होते.
सन्मान झाल्यानंतर नूतन अध्यक्ष तनपुरे यांनी सभासद, कामगार व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, डॉ. तनपुरे कारखान्याचे गतवैभव प्राप्त व्हावे या अपेक्षेने निवडणूक लढली. निवडणुकीत विजय मिळाला असून आता खरी कसोटी तनपुरे कारखाना सुरू करण्याची आहे. खडतर मार्ग असला तरीही कारखाना सुरू करण्यात बहुतेक ठिकाणी सहकाराचा हिरवा कंदिल मिळत आहे. वेळ आल्यावर सर्व काही सांगणार आहे. परंतु तनपुरे कारखाना डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू करणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वाबळे यांनी सांगितले की, डॉ. तनपुरे कारखान्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कारखान्याचे कामगार, सभासद, मशिनरी व नियोजन सांभाळताना संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. परंतु अरुण तनपुरे हे शब्द पाळणारे नेते आहेत. ते तनपुरे कारखाना सुरू करून राहुरीकरांची स्वप्नपूर्ती करणारच, असा विश्वास वाबळे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, नवाजभाई देशमुख, मच्छिंद्र सोनवणे, आप्पासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संचालक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केले.
तनपुरे कुटुंबीयात तिसरे अध्यक्ष
डॉ. बाबूराव दादा तनपुरे कारखान्याचे संस्थापक स्व. बाबूरावदादा तनपुरे यांनी अध्यक्षपद भुषविले होते. त्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जनसेवा मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून बराच काळ कारखाना चालविला. तनपुरे कुटुंबीयातून तिसरे अध्यक्ष म्हणून अरुण तनपुरे यांना मान मिळाला आहे. तनपुरे कारखाना बंद अवस्थेत असल्याने आर्थिक संकटावर मात करून तनपुरे यांच्यापुढे कारखाना सुरू करण्याचे आवाहन आहे.