नगर: फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये झालेले नुकसान लपवण्यासाठी घरफोडीचा बनाव रचणाऱ्या फिर्यादीचाच कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४ तासांत पर्दाफाश केला. याप्रकरणी फिर्यादी युवकालाच पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आदर्श ज्ञानदेव तनपुरे (रा. मराठानगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १७ नोव्हेंबर रोजी रात्री कोणीतरी चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. एक लाख २५ हजारांची रोकड चोरून नेली. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस यांच्याकडे देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक युनिट व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.
तपासादरम्यान फिर्यादीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. तसेच, फिर्यादी ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यानेच घरफोडीचा बनाव रचल्याचे कबूल केले.
पोलिसांनी संबंधित बँकेतून खात्याचे विवरण घेतले तसेच पंचनामा करून फिर्यादीचा मोबाइल जप्त केला. त्यातूनही 'एक्सएमडी मॅट' खात्याशी संबंधित तपशील समोर आल्याने फिर्यादीनेच हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. यावरून फिर्यादीला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल चिटणीस, उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस अंमलदार बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, विनोद बोरगे, विशाल दळवी, संदिप शिरसाठ, सत्यजित शिंदे, सूरज कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, रमेश शिंदे, अतुल लाटे, संकेत धिवर, वैभव काळे यांच्या पथकाने केली.
घरी कोणी नसल्याचा घेतला फायदा
दिवाळी सणानिमित्त आई माहेरी गेल्यानंतर घरात असलेली १ लाख २५ हजारांची रक्कम फिर्यादीने थोडी-थोडी करून आपल्या एचडीएफसी बँक खात्यात भरली. पुढे त्याने ही रक्कम 'एक्सएमडी मॅट' खात्याद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवली, मात्र त्यात त्याचे नुकसान झाले. याबाबत घरच्यांना कोणतीही माहिती न देता त्याने घरफोडीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.