नगरमधील पाच कत्तलखाने जमीनदोस्त; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई Pudhari
अहिल्यानगर

Slaughterhouse Demolition: नगरमधील पाच कत्तलखाने जमीनदोस्त; महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

व्यापारी मोहल्ला, बागवान गल्ली आणि झेंडीगेट भागात गोवंशाची कत्तल सुरू होती.

पुढारी वृत्तसेवा

नगर: पोलिस प्रशासनाच्या आहवालानंतर महापालिकेने झेंडीगेट भागातील गोवंशाची कत्तल करणाऱ्या पाच कत्तलखान्यावर हतोडा टाकत जमीनदोस्त केले. पोलिसांनीही कायद्याचे फास आवळत गोवंशाची कत्तल करणाऱ्या चौघांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करत असल्याचे आदेश काढले. कत्तल करणाऱ्या आणखी काही आरोपींवर हद्दपारीची कार्यवाही पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. व्यापारी मोहल्ला, बागवान गल्ली आणि झेंडीगेट भागात गोवंशाची कत्तल सुरू होती.

कोतवाली पोलिसांनी यापूर्वी झेंडीगेट भागात कत्तलखान्यावर छापेमारी केली होती. त्यावेळी कत्तलखान्याचे जागा मालक कोण हे निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे या जागेत अवैध कत्तलखाने सुरू असल्याचा आहवाल कोतवाली पोलिसांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना पाठविला. (Latest Ahilyanagar News)

पोलिस अधीक्षकांनी तसा प्रस्ताव महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना पाठवत कत्तलखाने कायमचे उध्वस्त करण्याची सूचना अहवालात केली. त्यानुसार दोन कत्तलखाने यापूर्वीच जमीनदोस्त करण्यात आली होती. गुरूवारी आणखी पाच कत्तलखान्यावर महापालिकेने जेसीबी चालवत जमीनदोस्त केले.

‌‘कोठला‌’ परिसरात रस्त्यावर मांस फेकल्याच्या संतापजनक घटनेनंतर शहरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आमदार संग्राम जगताप व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली रास्तरोको आंदोलन केले. आ. संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला 25 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. सूर्योदय होताच कारवाई केली जाईल, या आयुक्त डांगे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन माघारी घेण्यात आले.

पोलिसाच्या अहवालानुसार महापालिकेने जेसीबीने कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची तयारी केली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी 100 पोलिसांचा फौजफाटा त्यासाठी दिला. महापालिका व पोलिसांचा मोठा लवाजमा पूर्ण तयारीनिशी गुरूवारी सकाळीच झेंडीगेट परिसरात धडकला. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाच कत्तलखान्यांवर जेसीबी चालवत ते जमिनीदोस्त केले.

दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरात रस्त्यावर मांस फेकल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा उद्रेक झाला होता. आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते रस्त्यावर उतरत आक्रमक झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

रस्त्यावर मांस फेकणाऱ्यास अटक करावी तसेच शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी करताच पोलिसांनी मांस फेकणाऱ्याचा शोध लावत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, काल दि. 18 रोजी एसपी घार्गे यांनी शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचे पोलिस प्रशासनाला आदेश केले होते. त्यासाठी पोलिस प्रशासन आणि मनपा अतिक्रमण पथक यांची संयुक्त ऑपरेशन राबविण्याचे ठरले. शंभरावर पोलिस व महापालिकेचा मोठा फौजफाटा झेंडीगेट भागात पोहचत पाच कत्तलखाने जमिनीदोस्त केलेे.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलिस निरीक्षक कोकरे, सहायक पोलिस निरीक्षक वारुळे, सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात, उपनिरीक्षक प्रविण पाटील, गणेश देशमुख, परशुराम दळवी यांच्यासह केोतवाली पोलिस ठाण्याचे 100 अंमलदार व अहिल्यानगर महानगरपलिकेचे शंभरावर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

झेंडीगेटचे चार वर्षभर तडीपार

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेशाने कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या जे आरोपी कत्तलखाने चालवितात, त्यांची माहिती संकलित करण्यात आली. मुंबई पोलिस अधिनियमान्वये ओवेस रशिद शेख (वय 24 रा. झेंडीगेट), शोएब रौफ कुरेशी (वय 28 रा. कारी मस्जिद जवळ), फैजल अस्लम शेख (वय 19 रा झेंडीगेट), मुसाबीर युसुन कुरेश,( वय 22 रा. झेंडीगेट) यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई केल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळाली.

अवैध गोवंशीय जनावरांची वाहतूक आणि त्यांची हत्या करून गोमांस करणारे तसेच त्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहे.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT