वाळकी: नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटादरम्यान मालवाहू टेम्पो व कारचा भीषण अपघात झाला. कार दुभाजक तोडून टेम्पोवर जाऊन आदळली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शिरूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पुण्याहून नगरच्या दिशेने येणारा मालवाहू टेम्पो हा कामरगावहून पुढे चास गावालगच्या उतारावरच्या वळणावर येत असताना नगरहून पुण्याच्या दिशेने जाणार्या कारने रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्या टेम्पोला धडक दिली. (Latest Ahilyanagar News)
यामध्ये चारचाकीत एकटे असणारे इनूस मोईनउद्दीन शेख (रा. शिरूर, जि. पुणे) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हातामध्ये, डोळ्यांमध्ये व शरीराच्या काही भागांमध्ये काचा घुसल्या होत्या. डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती ठीक आहे. अपघातानंतर नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश जंबे यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.