Fake Police Extortion Pudhari
अहिल्यानगर

Fake Police Extortion Cyber Crime: पोलिस असल्याचे भासवून खंडणी मागणारा तोतया अधिकारी अटकेत

सायबर पोलिसांची कारवाई; नक्षलग्रस्त गडचिरोलीतून आरोपीला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

नगर: पोलिस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिस अधिकाऱ्याला सायबर पोलिसांच्या पथकाने गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातून बेड्या ठोकल्या.

चंदन दिगुराम सांगळे (रा.आष्टी,गडचिरोली) असे त्याचे नाव आहे. सांगळेने स्वतःची ओळख ‌’वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील‌’ अशी सांगून तुमच्याविरुद्ध तक्रार आली आहे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल, तर 5 लाख रुपये द्या, अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी करीत होता. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आरोपीचा शोध घेण्याच्या पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांना सूचना केल्या. त्यानुसार सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक गडचिरोलीला रवाना झाले. आष्टी (ता. चामोर्शी) परिसरात पोलिस पथकाला पाहताच आरोपी चंदन दिगुराम सांगळे (रा.आष्टी) याने मोटारीने कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, नक्षलग्रस्त व दुर्गम भाग असूनही पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास आष्टी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला आज सायबर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले, पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलिस अंमलदार मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, अभिजित अरकल, आप्पासाहेब हिंगे, चालक महमंद शेख, निळकंठ कारखिले यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT