नगर: रासायनिक क्रीमपासून बनावट दुधाची निर्मिती करून विक्री केल्याचा गुन्हा जामखेड पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात आतापर्यंत पाच जणांना अटक झाली होती. त्यात राहुरी तालुक्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे. या गुन्ह्यात समीर शेख याच्या नंतर नेवासा अर्जुन जगदाळे दुसरा मास्टर माईंड असल्याचेही तपासात समोर आले आहे.
संतोष माधव धसाळ (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) याला पोलिसांनी काल अटक केली. यापूर्वी समीर कमरूद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी), रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद), किरणकुमार भास्कर रोहकले (रा. श्रीरामपूर) व अर्जुन हरीश्चंद्र जगदाळे (रा. नेवासा) यांना अटक करण्यात आलेली ओह.
बनावट दुधाच्या गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यासह बीड, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 31 जणांचा सहभाग झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
तपासी अधिकारी उपनिरीक्षक समीर अभंग यांनी त्यांना रेकॉर्डवर घेतले असून, त्यांचा तपास सुरू आहे. गत आठवड्यात किरणकुमार भास्कर रोहकले (रा. श्रीरामपूर) व अर्जुन हरिश्चंद्र जगदाळे (रा. नेवासा) यांना अटक केली आहे. दरम्यान, पथकाने राहुरी तालुक्यातून संतोष धसाळ याला काल ताब्यात घेतले.
आज त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बनावट दुधाच्या गुन्ह्याचा मास्टर माईंड आरोपी समीर शेख याच्यानंतर दुसरा मास्टर माईंड म्हणून आरोपी अर्जुन जगदाळे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो परराज्यातूनही अनेक गोष्टी मागवत होता. मात्र, तो नेमके काय मागवत होता याचा आता पोलिस शोध घेत आहेत.