Political News: विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताच उमेदवारांच्या खर्चाचे मीटर सुरु होत आहे. आतापर्यंत 53 उमेदवारांनी अर्ज भरले असून, प्रचारासाठी झालेला दैनंदिन खर्च निवडणूक विभागाच्या खर्च नियंत्रण समितीला सादर करावा लागत आहे. दरम्यान, खर्च नियंत्रण समितीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत प्रचार साहित्यांचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार मांसाहारी थाळी 240, बिर्याणी 150 रुपये, चहा 10, साधी राईसप्लेट 115 रुपये असा दर असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास निवडणूक आयोगाने मुभा दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होताच उमेदवारांना प्रचारासाठी करण्यात आलेला खर्च दैनंदिन सादर करण्याची सक्ती केलेली आहे. अद्याप प्रचाराची रणधुमाळी म्हणावी अशी सुरु झालेली नाही.
4 नोव्हेंबरनंतर बाराही मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारांच्या सभा, बैठका, रॅली व इतर खर्चावर निवडणूक विभागाच्या विविध पथकांचा वॉच असणार आहे. त्यामुळे दररोजचा होणारा खर्च दुसर्या दिवशी सादर करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची दमछाक होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हा खर्च नियंत्रण समिती स्थापन केली असून, या समितीने प्रचारासाठी आवश्यक असणारे विशिष्ट घटकांचे बाजारातील सध्याचे दर मागवून घेतले. त्यानंतर जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन प्रचार साहित्याचे तसेच भोजनावळीचे दर निश्चित केले आहे.
प्रचार म्हटले की, कार्यकर्त्यांसाठी भोजन, नाश्ता, वाहने आली. प्रचारासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी वापरण्यात आलेली वाहने, उमेदवारांचे आणि पक्षांचे बॅनर आदीवर तसेच सभा, बैठका व रॅली आदींसाठी लागणारे मंडप, खुर्च्या, वाहने आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. या सर्व खर्चाचे हिशेब उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सादर करावे लागणार आहेत. सादर केलेला खर्च देखील निवडणूक विभागाने प्रसिध्द केलेल्या दरानुसार ग्राह्य धरला जाणार आहे.
निवडणूक विभागाने निश्चित केलेले दर
कॅप : 85, गांधी टोपी 10, टी शर्ट : 150, लहान शाल : 105, मोठी शाल 150, पाच मीटरचा फेटा 300, कापडी बॅनर्स (स्केअर मीटर) : 300, फ्लेक्स डीजिटल (प्रती स्केअर फूट) : 7.43.
भोजन आणि खाद्य पदार्थ : कॉफी 15, पाणी बॉटल : 17, वडापाव :15, भजी 20, पोहे : 20, समोसा : 15, राईसप्लेट (स्पेशल) 180, पाण्याचे टँकर 2200. हारतुरे : लहान हार 30, मोठा हार 80, व्हीआयपी पुष्पगुच्छ 100, स्टेज (प्रती स्केअर फूट) 25, स्वागत गेट (मोठे) 8 हजार, फोटोग्रॉफ (कॉपी) 4, जेसीबी (गुलाल)1500, पगडी 2000, तलवार 100. वाहने : ऑटो रिक्षा (24 तास) 1200, काळी/ पिवळी टॅक्सी 3000, जीप /बोलेरो 3300, स्विफ्ट डिझायर 3200, इंडिका/ वॅगनर 3000, होंडा सिटी/फोर्ड फिस्टा 3800, स्कार्पिओ / झायलो 4200. सभेसाठी : गांधी मैदान 3139, जॉगिंग पार्क 10000, स्टेज (प्रती स्केअर फूट) 25, स्वागत गेट (मोठे) 8 हजार, प्लास्टिक खुर्ची 10, कुशीयन खुर्ची 30, टेबल 30, व्हीआयपी सोफासेट 1500, कुलर तसेच जनरेटर 125 (के.व्ही.) 1500, व्हिडिओग्राफी : 1389, जेसीबी (गुलाल)1500, पगडी 2000, तलवार 100.