डोंबिवली : कारगिल युद्ध स्मारक, फुटबॉल स्पर्धा, समुद्रातील भयावह जलतरणासह माऊंट एव्हरेस्टचे टोक गाठत कल्याणमधील विद्यार्थ्यांनी एक धाडसी मोहीम पार पाडत चित्तथरारक अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आवडत्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरिता शालेय संस्था प्रयत्नशील असतात. कल्याणच्या ग्रामीण भागातील सॅक्रेड हार्ट नामक शाळेने तर त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण व्हावे, याकरिता वेगवेगळ्या माध्यमांतून थरारक अनुभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात कारगिल युद्ध स्मारक, फुटबॉल स्पर्धा, शॉर्ट फिल्म फेस्टीव्हल, समुद्रातील भयावह जलतरण स्पर्धा, माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पसारख्या क्षेत्रात अनुभव घेतला. या क्षेत्रात अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यावर बेतलेल्या चांगल्या/वाईट प्रसंगांची माहिती कथन केली. या विद्यार्थ्यांनी हिंद महासागराच्या पाण्यात श्रीलंकेतील तलाईमन्नार ते रामेश्वरमपर्यंत एक धाडसी मोहीम पार पाडली. अनस्टॉपेबल सेक्रेड हार्टच्या आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी भारताला भेट दिली. विद्यार्थ्यांनी खोल पाण्यात 30 किमी अंतर कापले. भारतीय तटरक्षक दलाचे 24 वे महासंचालक वीरेंद्र सिंग पठानिया यांनी क्रूचे स्वागत केले. यामध्ये सक्षम म्हात्रे, रोनित म्हात्रे, निनाद पाटील, समृद्धी शेट्टी, तृप्ती गुप्ता, श्रीरंग साळुंके, त्रिशा शेट्टी, सिद्धेश पात्रा, अभिप्रीत विचारे, अमोदिनी तोडकर यांचा सहभाग होता. राम म्हात्रे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एप्रिल-मे दरम्यान अकरावीतील सात विद्यार्थ्यांची टीम दोन शिक्षकांसह, एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासाला निघाली. ही टीम जगातील सर्वोच्च पर्वत शिखराच्या जवळ पोहोचली. या यशामुळे 17 हजार 598 फूट उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी ही महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली आहे. यात अदिती पुनेजा, आदिल पिल्लई, मिताशी कुकरेजा, क्रिश पेसवानी साजिरी गवळी, संजना पानसरे, शिवराज गोराड यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सजिता नायर, प्रशिक्षक अबर्णा सेथुरामन यांनी प्रशिक्षण दिले. अरिंदम बोलकेच्या नेतृत्वाखाली ज्युनियर फुटबॉल संघाने राष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवला. पोर्तुगालमध्ये प्रशिक्षकांनी त्यांच्या विलक्षण कौशल्याची ओळख पटवली.
13 जून रोजी 32 कॅडेट्सनी 11 हजार फूट उंचीवर असलेल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. 36 व्या माऊंटन ब्रिगेडच्या अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. रायफलमॅन लिट्रिब यांनी त्यांना 1998 च्या कारगिल युद्धाची माहिती दिली. ओव्हरसाईट ही आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी बनविलेली शाळेची पहिली शॉर्ट फिल्म आहे. प्रतिष्ठित दिल्ली लघु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
शिक्षणाबरोबर इतर कलांगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने कारगिल युद्ध स्मारकाच्या ठिकाणी लष्करी कवायत, फुटबॉल स्पर्धा, समुद्रातील जलतरण स्पर्धा, माऊंट एव्हटेस्ट बेस कॅम्प यासारख्या क्षेत्रात विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात उंचावल्याचे मुख्याध्यापिका विनिता राज यांनी सांगितले. तर भविष्यातील उत्तम नागरिक घडविल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही त्या म्हणाल्या.