Ashok Kharat pudhari photo
अहिल्यानगर

Ashok Kharat: भोंदू खरातची कबुली; समता मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैशांचे व्यवहार झाल्याचा दावा

ईडी कोठडीत धक्कादायक खुलासा; 13.92 कोटी रोख, दागिने व खाती गोठविल्याचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर: ईडीच्या ताब्यात असलेल्या भोंदू खरातने अखेर मौन सोडले. त्याला विशेष न्यायालयात हजर केले असता, त्याने ‌‘समता‌’च्या मॅनेजरच्या सांगण्यावरूनच विविध खात्यांवर पैसे टाकल्याची धक्कादायक कबुली दिली. तर, नॉमिनीबाबत मात्र, आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगून खरातने कानावर हात ठेवले. खरातला मंगळवारी (दि. 26) पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, ईडीने अशोक खरात याला दि. 20 रोजी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीशांनी ‌‘तुमच्यावर नेमके काय आरोप आहेत, हे तुम्हाला समजतेय का?‌’ असे विचारले. त्यावर खरातने मौन सोडले.

‘माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून, येथे 9 टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला हे पैसे वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी ते पैसे ठेवले,‌’ असे खरातने सांगितले.

त्यावर, न्यायाधीशांनी, जर सर्व काही नियमानुसार होते, तर तुम्हाला या सगळ्या खात्यांना वारसदार करण्याचे कारण काय, असा प्रश्न केला. त्यावर खरात म्हणाला, ‌‘त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. आता तपास झालाय. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढेच मला माहिती आहे.‌’ उद्या दि. 26 रोजी खरातची ईडी कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या वेळी त्याचा कोठडीतील मुक्काम वाढणार का, याकडे लक्ष असणार आहे.

दरम्यान, दि. 13,14,17,23 एप्रिल तसेच 5 आणि 18 मे रोजी शिर्डी, राहात्यासह नाशिक, पुणे व अन्य 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यामध्ये 13.92 कोटी रोख, 5000 अमेरिकी डॉलर, 1.12 कोटींची दागिने जप्त केले होते. 2.25 कोटींची बँक खाती गोठविण्यात आली होती. या गुन्ह्यात मनी लाँडरिंगची शक्यता असून, त्या दिशेने ईडीने तपास केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT