Mula Right Canal Water Wastage Pudhari
अहिल्यानगर

Mula Right Canal Water Wastage: दुष्काळात पाटपाण्याची उधळपट्टी! मुळा उजवा कालव्यातून पाणी वाया

कुकाणा-घोडेगाव मार्गावरील ओढ्यांत पाणी वाहून जातेय; आवर्तन बंद करून पाण्याचे नियोजन जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: दुष्काळी झळामुळे पाण्याची टंचाई सुरू असताना कुकाणा पाटबंधारे विभागांतर्गत पाटपाण्याचा अपव्यय सुरू आहे. कुकाणा-घोडेगाव मार्गावर देवगाव शिवारात ओढ्याला असे पाटपाणी खळखळून वाहून जात आहे. एकीकडे सरकारी यंत्रणा पाणी बचतीचे धडे देत असताना दुसरीकडे पाटपाण्याची नासाडी सुरू आहे. याच मार्गावरील कौठा येथील ओढेही पाण्याने वाहत आहेत. पाहिजे त्याला नको भलतीकडेच पाटपाण्याचा ओढा वाहत असल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुळा उजव्या कालव्यातून दोन महिन्यांपासून शेतीसाठी आवर्तन सुरू झाले आहे. परंतु आवर्तन बंद करण्याची मागणी केली जात असताना पाटबंधारे विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याने पाणी बचतीचे धडे देणाऱ्या मुळा पाटबंधारे विभागाकडून पाटपाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने अक्षरशः दुष्काळात पाण्याची होणारी उधळपट्टी आता तरी थांबवा अशी मागणी करत पुढे काय होईल असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा उजवा कालवा गेल्या दोन महिन्यांपासून अविरतपणे चालू आहे. यावर्षी मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात काहीच पाऊस नसल्याने पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. आता सर्वत्र साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्याने पाणी कोणी घेत नाही. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.

पाटपाण्यावर वरिष्ठांचे काही नियोजन आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच आवर्तनाचे योग्य नियोजन केले असते, तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काही पाणी उपयोगात आले असते. परंतु भर दुष्काळात पाटबंधारे विभाग या पाणी उधळपट्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी बोलतात. या प्रकारामुळे तातडीने आवर्तन बंद करावे व यापुढील पाण्याचे नियोजन जाहीर करावे अशी मागणी देडगाव, रस्तापूर, कोठा, चांदा, फत्तेपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हलगर्जीपणा करणाऱ्यांना जाब विचारा

दरम्यान अनेक ठिकाणी बंधारे भरण्याची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी दुष्काळात बंधारे काही प्रमाणात भरले तर रब्बीतील काही पिके घेता येतील याकरिता बंधारे भरावेत अशी मागणी केली आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराने पाटपाण्याची नासाडी होत असल्याचे दिसत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी जाब विचारण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT