नगर: नगर शहर आणि उपनगरांतील घरोघरी पहाटेचे अभ्यंगस्नान, गोडधोड फराळाने सुरू झालेला दिवाळीचा नरक चतुर्दशी हा मंगलमय दिवस पणत्यांच्या तसेच दीपमाळांच्या विद्युत रोषणाईने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघाला. या मंगलमय दिवशीच सोमवारी लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक ते पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. गेल्या काही दिवसांपासून खरेदीसाठी फुलून गेलेल्या बाजारपेठेत सोमवारीदेखील मोठी गर्दी उसळली होती. (Latest Ahilyanagar News)
दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने शुक्रवारपासूनच (वसूबारस) प्रारंभ झाला. या सणाचा दीपोत्सव मात्र नरक चतुदर्शी या मंगलमय दिवसाने सुरू होतो. त्यामुळे सोमवारी (दि.20) पहाटेपासूनच घरोघरी अभ्यंगस्नानासाठी लगबग सुरू होती. अभ्यंगस्नान आटोपल्यानंतर महिला मंडळींनी घरासमोर रांगोळी काढली. त्यानंतर नवीन कपडे परिधान करून घराघरांत एकत्रितपणे गोडधोड फराळ करण्यात आला. नातेवाईक, मित्रमंडळींना दीपावली शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर नागरिकांची लगबग सुरू होती.
मंगळवारी (दि.21) होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या पूर्वतयारीसाठी नागरिकांनी दुपारीच बाजारपेठ गाठली. लक्ष्मीची मूर्ती, पणत्या, पाच फळे लाह्या आदी पूूजेचे साहित्य खरेदीसाठी नगर शहर आणि उपनगरांत गर्दी झाली. दिवाळी सणासाठी आवश्यक असणारे कपडे, रेडीमेड फराळ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी दुकाने देखील सोमवारी गर्दीने फुलून गेली होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी फुलांची मोठी मागणी असते. त्यामुळे शहरातील रस्त्यारस्त्यांवर झेडू, शेवंतीसह विविध रंगबेरंगी फुलांची दुकाने थाटली होती. त्यामुळे शहरभरात चैतन्याचे आणि व्यापारी वर्गांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे शहरातील मध्यवस्तीत तसेच उपनगरांतील ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
सोमवारी सायंकाळी घरोघरी पणत्यांचा आणि विद्युत रोषणाईच्या दीपमाळांनी शहर दीपोत्सवाने उजळून निघाले. रात्री उशिरापर्यंत शहर आणि उपनगरांत फटाक्यांची आतषबाजी करीत आबालवृद्ध दीपोत्सवाचे स्वागत करीत होते.