पाथर्डी: प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बहुचर्चित वादानंतर त्यांचे वडील तथा निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डीतील (भालगाव) निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तीस जणांच्या पथकाने मंगळवारी दिवसभर झाडाझडती घेतली. त्यात १२७ विविध नोंदी तपासल्यानंतर तेरा कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे समोर आले.
एसीबीने १२७ नोंदींच्या माध्यमातून उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेचा तपशील तपासला. त्यात कुटुंबीयांची उत्पन्न, मालमत्ता व खर्चाबाबत प्राप्त कागदपत्रांची छाननी करून एसीबीने बेहिशेबी मालमत्तेचा निष्कर्ष नोंदविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाहनांची खरेदी-विक्री, वाहनांच्या देखभालीवरील खर्च, टेलिफोन व मोबाईलवरील खर्च, विविध बँक व्यवहार, विमा आणि इतर आर्थिक व्यवहारांच्याही नोंदी आहेत. बँक खात्यांतील व्यवहार, कर्ज, वाहनांवरील खर्च तसेच कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणावरील खर्चाचाही तपशीलही फिर्यादीत देण्यात आला आहे.
खेडकर कुटुंबाच्या विविध मालमत्ता, बँक खात्यांतील व्यवहार, मालमत्तेच्या उघड चौकशीचा अहवाल तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी पहाटे नाशिक व अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पथके पाथर्डीत दाखल झाली. भालगाव येथील खेडकर यांच्या घरासह संबंधित ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. अनेक तास ही कारवाई सुरू होती. विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, छाप्यात नेमके कोणते साहित्य अथवा कागदपत्रे जप्त करण्यात आली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दिलीप खेडकर हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. पूजा खेडकर यांच्या प्रशासकीय सेवेशी संबंधित पुण्यातील वादानंतर खेडकर कुटुंब चर्चेत आले. आता बेहिशेबी मालमत्ता व उत्पन्न-खर्चातील कथित तफावतीच्या प्रकरणात खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.