ढोरजळगाव: शेवगावच्या पश्चिम भागाची वरदायिनी असणाऱ्या ढोरा नदीपात्रात सध्या राजरोसपणे रात्री-अपरात्री वाळूचा बेसुमार सुरू असून, वाळूबरोबरच परिसरात मुरूम, गौण खनिज तस्करीचे स्तोम मोठ्या प्रमाणात माजले आहे.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या आदेशालाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शेवगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा ढोरा नदीवरील बंधाऱ्यांच्या मालिकेमुळे जलसमृद्ध बनला आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आल्याने पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली. नदीचे पाणी कमी झाल्याबरोबर या सोन्याचे मोल असलेल्या वाळूवर तस्करांची वक्रदृष्टी पडली. ढोरजळगाव परिसरातील ढोरजळगाव, आपेगाव, आखतवाडे, निंबेनांदूर, मळेगाव, सामनगाव, वडुले, वाघोली येथील नदीपात्रात अक्षरशः तस्करांची झुंड पडली असून, राजरोसपणे रात्री बरोबर दिवसाही ट्रॅक्टर, डंपर व इतर साधनांच्या साह्याने वाळूची बेकायदा वाहतूक सुरू आहे.
घरकुलासाठी मोफत वाळू देण्याची घोषणा करणाऱ्या शासनाकडून मात्र प्रत्यक्ष या आदेशाची अंमलबजावणी होत नसून, गोरगरिबांना घरे बांधण्यासाठी हक्काची वाळू सोन्याच्या भावात खरेदी करावी लागत आहे. जेसीबी किंवा कामगारांच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे नदीपात्रात पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे मागील वर्षी सामनगाव येथे पोहण्यासाठी उतरलेल्या शिक्षकाचा बुडून मृत्यू झाला होता. यामुळे पर्यावरणही धोक्यात सापडले आहे.् ऐन उन्हाळ्यात भूजल पातळी खालावून शेतकऱ्यांसमोर जलसंकट उभा राहण्याची शक्यता आहे.
या तस्करांना कुणाचे भय राहिले नसून. अल्प रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणावर मुरूम उचलायचा किंवा रॉयल्टी न भरताच जेसीबीच्या साह्याने अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा सुरू आहे. यातून शासनाचा महसूल बुडवला जात आहे.
महसूल-पोलिसांची चुप्पी
वाळू वाहतुकीची वाहने भरधाव चालवत कर्णकर्कश हॉर्न वाजविली जात असल्याने अपघात होण्याची ही शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाच्या चुप्पीने नागरिक संभ्रमात आहेत.