देवळाली प्रवरा: देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बोलावलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. यामध्ये उपनगराध्यक्षपदी बेबीताई बर्डे तर स्वीकृत नगरसेवक पदी सचिन शेटे व ऋषभ लोढा यांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडीवेळी मतदान झाले, यात विरोधी गटाला चमत्काराची अपेक्षा होती. मात्र आहे त्या संख्याबळातही एक मत कमी झाल्याने भाजप विरोधकांतही फूट पडल्याचे दिसले.
नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. दुपारी बारा वाजता विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा कडून नगराध्यक्षांसह 16 नगरसेवक निवडून आले. आणि काँग्रेसचे 4 शिंदे सेनेचे 1 व वंचित आघाडीचा 1 असे विरोधकांचे 6 जण निवडून आले.
सत्ताधारी भाजपाकडून बेबी संजय बर्डे यांचे नाव पुढे आले तर विरोधकांकडून संतोष एकनाथ चोळके यांनी अर्ज भरला. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपाच्या बेबी संजय बर्डे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित स्वीकृत संचालक व उपनगराध्यक्ष यांचा माजी आमदार चंद्रशेखर पा. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेना पुन्हा भाजपसोबत?
विरोधकांकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करताना सत्ताधारी पक्षातून आम्हाला किती मत मिळतात, हे पाहण्यासारखे ठरेल, कारण तेथीही आमचे काही प्रेमाची लोक आहेत, असे सांगण्यात आले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सहा पैकी संतोष चोळके यांना पाचच मते मिळाली. शिवसेनेकडून निवडून आलेल्या आशाताई केदारनाथ चव्हाण यांनी भाजपाच्या बेबी बर्डे यांच्याकडे हात उंचावून आपले मत दिल्याने विरोधकात फूट पडल्याचे निदर्शनास आले.
आदिवासी समाजाला संधी
उपनगराध्यक्षपदी बेबीताई संजय बर्डे यांची निवड झाल्याने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे आदिवासी समाजा विषयी प्रेम दिसून आले. तर भाजपाकडे उच्चनीच, जाती धर्माला थारा नाही. हे नगराध्यक्ष कदमांनी दाखवून दिल्याचे जाणकारांनी सांगितले.