अहिल्यानगर : डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून, नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.. (Latest Ahilyanagar News)
डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा 15वा आठवडा केडगाव मोहिनीनगर येथे राबविण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, उपायुक्त संतोष टेंगळे, सोन्याबापू घेंबूड, आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर, मुख्याध्यापक संदीप भोर, किसन दुधाडे, मुख्याध्यापिका वैशाली मैकल, प्रभाग अधिकारी शहाजान तडवी, सुखदेव गुंड, डॉ. सृष्टी बनसोडे आदी उपस्थित होते.
आयुक्त डांगे म्हणाले की, डेंगूसदृश्य आजाराचे काही रुग्ण या भागामध्ये आढळले असून, महापालिका आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवली आहे. नागरिकांनीही आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे टाकावीत, असे सांगितले.
माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, मनपा विकासकामांबरोबरच नागरिकांना आरोग्याच्या सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आयुक्त डांगे यांच्या संकल्पनेतून शहरात डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान राबविले असून, खर्या अर्थाने नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महापालिकेने केडगाव देवी परिसरात स्वच्छता मोहीम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
मनपातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त केडगाव रेणुका माता देवी मंदिर परिसरात विविध उपाययोजना राबवल्या असून, स्वच्छता पंधरवडा अभियानानिमित्त केडगाव देवी रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली, तसेच या परिसरामध्ये औषध फवारणी केल्याचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले.
आयुक्तांकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी
आयुक्त यशवंत डांगे यांनी डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानानिमित्त मोहिनी नगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संवाद साधत विद्यार्थ्यांना बोलते केले आरोग्याबाबत मुलांमध्ये जनजागृती केली तसेच नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव देवी परिसरातील रस्त्यावरील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली.आयुक्तांकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी