Dancer Attacked Jamkhed
जामखेड : फोनवर बोलत नाहीस, माझा नंबर ब्लॉक का केला, या रागातून एका तरुणाने नृत्यांगना असलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड येथे घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री तुषार सावंत (वय २६, रा. वाघोली, जि. पुणे, सध्या रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही मैत्रीण मनीषा प्रकाश जावळे हिच्यासोबत जामखेड येथे राहत असून नृत्यांगना म्हणून उदरनिर्वाह करते. गेल्या पाच वर्षांपासून तिचे आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी मैत्रीचे संबंध होते. मात्र २०२४ पासून हे संबंध तुटले आहेत. यापूर्वीही पीडित महिलेने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुरुवारी (दि. ५) रात्री आरोपीने पीडितेला फोन करून ‘माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू बोलली नाहीस, तर तुला ठार मारेन,’ अशी धमकी दिली. पीडितेने त्याचा फोन कट केला. यानंतर शुक्रवारी (दि. ६) पहाटे २ वाजता गायत्री सावंत व तिची मैत्रीण मनीषा जावळे रूममध्ये असताना आरोपी इमारतीत दडून बसल्याचे आढळले.
मनीषा बाल्कनीत गेली असता आरोपी तेथे लपून बसलेला होता. त्यानंतर तो हातात कोयता घेऊन गायत्रीच्या रूममध्ये घुसला. ‘माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?’ असे म्हणत त्याने तिच्या बोटांवर, हातावर व डोक्यावर कोयत्याने वार केले. मनीषा जावळे हिने आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शिवीगाळ करत ‘मी तुला संपवून टाकेन,’ अशी धमकी देत तेथून पळ काढला.
या प्रकरणी गायत्री सावंत हिच्या फिर्यादीवरून राहुल कचरे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.